मुलुंड.. ठाण्याला खेटून असलेले मुंबईचे हे प्रवेशद्वार. ठाणे किंवा आसपासच्या शहरांतून पूर्व उपनगरमार्गे मुंबईत दाखल होणाऱ्या प्रत्येकाला मुलुंडमधूनच यावे लागते. पालिकेच्या महसुलात घसघशीत भर घालणाऱ्या जकात नाक्यांपैकी एक मुलुंड नाका. त्यामुळे मुलुंड प्रवेशद्वारावर कायम वाहनांची वर्दळ दिसते. या परिसरात मराठी, शीख आणि गुजरातीबहुल वस्त्या असून नीटनेटक्या उच्चभ्रू वस्त्यांबरोबर अनेक बकाल झोपडपट्टय़ाही मुलुंडमध्ये सामावल्या आहेत. मराठी नाटय़रसिकांसाठी महाकवी कालिदास नाटय़गृह, चित्रपटवेडय़ांसाठी गणेश चित्रपटगृह ही मनोरंजनाची ठिकाणे. मुलुंड परिसरात अनेक छोटी-मोठी उद्याने असली तरी मुलुंडवासीयांच्या दृष्टीने डॉ. चिंतामणराव देशमुख उद्यान आणि जॉन्सन उद्यान लक्षवेधी ठरले आहे. तर मुलांना खेळण्यासाठी राजे छत्रपती संभाजी मैदानासह अनेक छोटी-मोठी मैदाने मुलुंडमध्ये उपलब्ध आहेत. बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुलुंडपर्यंत विस्तारले आहे. याव्यतिरिक्त मुलुंडकरांसाठी आकर्षक मनोरंजनाचे ठिकाण नाही. पण नाटय़गृह आणि चित्रपटगृहे सध्या बंदच आहेत. डॉ. चिंतामणराव देशमुख उद्यान सुशोभीकरणासाठी बंद आहे, तर राजे छत्रपती संभाजी मैदानाची दैन्यवस्था झाल्यामुळे त्याच्या सुशोभीकरणाचा प्रस्ताव तयार आहे. त्यामुळे हे मैदान नजीकच्या काळात कामानिमित्त बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुलुंडवासीयांना विरंगुळ्यासाठी व्यवस्थाच नाही. त्यामुळेच अलीकडच्या काळात उभ्या राहिलेल्या मॉल संस्कृतीला मुलुंडकरांनी हळूहळू आपलेसे केले आहे. केवळ विरंगुळ्यासाठी फेरफटका मारणारे अनेक मुलुंडकर मॉलमध्ये दृष्टीस पडू लागले आहेत.
भाजपचे आव्हान
एकेकाळी मुलुंड हा जनसंघाचा बालेकिल्ला म्हणूनच परिचित होता. जनसंघाचे रूपांतर भाजपमध्ये झाले आणि त्यानंतर मुलुंड भाजपचा बालेकिल्ला बनला होता. मात्र १९८० च्या दशकामध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये शिवसेनेने भाजपच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले. शिवसेनेचे अॅड. बाळकृष्ण जोशी यांनी १९८५ मध्ये भाजपला पराभवाची धूळ चारली. त्यानंतर शिशिर शिंदे, प्रभाकर शिंदे आदींनी मुलुंडमधील शिवसेनेचे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी हातभार लावला. कालांतराने भाजपच्या या बालेकिल्ल्यात लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही शिरकाव केला. मात्र असे असले तरी पालिका निवडणुकांमध्ये भाजपने सहापैकी तीन प्रभाग आपल्याकडे राखण्यात यश मिळविले. मनसेमुळे शिवसेनेची या परिसरात गळचेपी झाली आणि एकाही प्रभागात शिवसेनेला आपला भगवा फडकविता आला नाही. शिवसेना-मनसेच्या वादात राष्ट्रवादीच्या दोन उमेदवारांच्या गळ्यात विजयाची माळ पडली, तर मनसेला एका उमेदवाराच्या विजयावर समाधान मानावे लागले होते. मागील लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा मुलुंडवर भाजपने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीमध्ये भाजपचे मोठे आव्हान इतर पक्षांपुढे असणार आहे.
प्रभागांच्या समस्या
प्रवेशद्वार परिसराची वाताहत
मुंबईचे प्रवेशद्वार अशी मुलुंडची ओळख आहे. वाहतूक कोंडी, खड्डेमय रस्ते यामुळे येथून मुंबईत प्रवेश करणाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. जवळच असलेल्या जकात नाक्यामुळे मोठय़ा वाहनांची प्रचंड वर्दळ येथे असते. जकात भरण्यासाठी लागणाऱ्या मोठय़ा वाहनांच्या रांगा रस्त्यावर लागल्यानंतर वाहतुकीचा पुरता बोजवारा उडतो आणि वाहनचालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. गेली अनेक वर्षे तेथे कायम अशीच परिस्थिती आहे. पण पालिकेला जकात नाक्यावर थांबणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र अशी सुटसुटीत व्यवस्था करण्यात आलेली नाही.
मोठे एकमेव मैदान
मुलुंडकरांना विरंगुळ्यासाठी फिरता यावे यासाठी मुलुंड पूर्व येथील महात्मा फुले मार्गावर मोठे असे केवळ एकमेव डॉ. चिंतामणराव देशमुख उद्यान आहे. मात्र, सुशोभीकरणाचे काम सुरू असल्याने हे उद्यान बंद आहे. मुलुंडमध्ये अनेक छोटी मैदाने आहेत. तेथे खेळण्यासाठी मुलांची कायम गर्दी असते. राजे छत्रपती संभाजी मैदानाला दुरुस्तीची गरज असून मैदान दुरुस्तीचा प्रस्ताव तयार झाला आहे. पालिका निवडणुकीनंतर हेही मैदान दुरुस्तीसाठी बंद करावे लागणार आहे.
गावठाणांचे प्रश्न ऐरणीवर
मुलुंड पूर्व परिसरामध्ये गवाणपाडा, नाणेपाडा, नवघर पाडा ही गावठाणे आपले अस्तित्व टिकवून आहेत. परंतु या गावठाणांमधील रहिवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अगदी अपुऱ्या पाणीपुरवठय़ापासून अस्वच्छतेपर्यंत अनेक समस्या गावठाणवासीयांना भेडसावत आहेत. गेल्या काही वर्षांपासून या गावठाणांमधील बैठय़ा घरांवर मजल्यांचे इमले चढविण्यास सुरुवात झाली आहे. अनधिकृतपणे उभारण्यात येणाऱ्या या मजल्यांमुळे गावठाणे धोकादायक बनू लागली आहेत.
कचराभूमीचा ज्वलंत प्रश्न
मुंबईमधील अनेक भागांतील कचरा मुलुंड (पूर्व) परिसरातील कचराभूमीत टाकण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षांपूर्वीच या कचराभूमीची क्षमता संपुष्टात आली आहे. मात्र तरीही तेथे टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याचे आता डोंगर उभे राहिले आहेत. कचराभूमीलगत असलेले हरिओम नगर, म्हाडा कॉलनी, कोपरी परिसरातील रहिवाशांना या कचराभूमीतील दरुगधीमुळे कायम त्रास सहन करावा लागत आहे. अधूनमधून कचराभूमीत लागणाऱ्या छोटय़ा-मोठय़ा आगींमुळे या परिसरात प्रदूषणाचा धोका वाढत असून आसपासच्या रहिवाशांच्या आरोग्याचे प्रश्नही निर्माण होऊ लागले आहेत.
‘झोपू’ प्रकल्प अडले
मुलुंड कॉलनी परिसरामध्ये हनुमानपाडा, पंचशील नगर, न्यू पंचशील नगर, अमर नगर या डोंगर परिसरात उभ्या असलेल्या झोपडपट्टय़ा. पावसाळ्यात कायम या झोपडपट्टय़ांवर दरड कोसळण्याची भीती असते. मात्र तरीही येथील रहिवासी झोपडी सोडून दुसरीकडे जाण्यास तयार होत नाहीत. त्याशिवाय केशवपडा, रामगड, इंदिरा नगर, नाहूर गाव, गवनी पाडा, विजय पाडा, सिद्धार्थ नगर, अशोक नगर अशा अनेक झोपडपट्टय़ा मुलुंडमध्ये उभ्या आहेत. यापैकी बहुसंख्य झोपडपट्टय़ांमध्ये ‘झोपडपट्टी पुनर्वसन योजने’चे वारे वाहू लागले आहेत. काही ठिकाणी योजना सुरू झाल्यानंतर अल्पावधीतच ती रखडली. तर काही ठिकाणी झोपडपट्टीवासीयांमध्ये मोठय़ा प्रमाणावर गटबाजी निर्माण झाल्यामुळे ‘झोपू’ योजनेला खीळ बसली.
मिठागरांवर गंडांतर
पूर्व द्रुतगती मार्गावर वसंतराव नाईक मार्गालगत मोठय़ा प्रमाणावर मिठागरे आणि कांदळवने आहेत. मात्र मिठागरे आणि कांदळवनामध्ये मोठय़ा प्रमाणावर सांडपाणी, मलयुक्त पाणी सोडण्यात आले आहे. या प्रकारामुळे रस्त्यालगतच्या मिठागरांची पुरती वाट लागली आहे. तशीच अवस्था कांदळवनाचीही झाली आहे. तसेच काही भागांत मोठय़ा प्रमाणावर डेब्रीज टाकण्यात आले आहे. त्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावण्यात न आल्याने कांदळवनालाही धोका निर्माण होत आहे.
अन्य समस्या
’ मुलुंडमधील नाटय़ाप्रेमींसाठी महाकवी कालिदास नाटय़गृह हे हक्काचे ठिकाण होते. परंतु नूतनीकरणाच्या कामासाठी गेल्या वर्षभरापासून हे नाटय़गृह बंद आहे.
’ मुलुंडमधील अनेक चाळी, गृहनिर्माण सोसायटय़ांच्या इमारती मोडकळीस आल्या होत्या. त्यांच्या पुनर्विकासाचे प्रकल्प हाती घेण्यात आले होते. मात्र काही समस्यांमुळे पुनर्विकासाचे प्रकल्प रखडले असून या इमारतींमधील अनेक कुटुंबांना भाडय़ाच्या घराचा आश्रय घ्यावा लागला आहे.
’ मुलुंडवासीयांना पूर्व-पश्चिमेला जाण्यासाठी नवघर रोडवरूनच जावे लागते. हा रस्ता कायम वाहनांच्या कोंडीत अडकलेला असतो, तर एलबीएस मार्गावरील दुतर्फा उभ्या असलेल्या वाहनांमुळे वाहतूक मंदावत असून त्यावरही तोडगा काढण्याची गरज आहे.
’ मुलुंड परिसरात नीलमनगर नाला, नाणेपाडा नाला, केसरबाग नाला हे तीन मोठे नाले आहेत. या नाल्यांची योग्य पद्धतीने सफाई होत नसल्यामुळे पावसाळ्यात मुलुंडमधील सखल भाग जलमय होण्याचे प्रकार घडतात.
सध्याचे नगरसेवक
’ प्रभाग – ९८
नगरसेवक – समिता कांबळे, भाजप
’ प्रभाग – ९९
नगरसेवक – मीनाक्षी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस
’ प्रभाग – १००
नगरसेवक – नंदकुमार वैती, राष्ट्रवादी काँग्रेस
’ प्रभाग – १०१
नगरसेवक –
सुजाता पाठक, मनसे
’ प्रभाग – १०२
नगरसेवक – प्रकाश गंगाधरे, भाजप
’ प्रभाग – १०३
नगरसेवक –
मनोज कोटक,
भाजप
फेररचनेनंतरची प्रभाग रचना
’ प्रभाग १०३
आरक्षण – खुला
लोकसंख्या – ६१,०७१
प्रभाग क्षेत्र – भांडुप कॉम्प्लेक्स, विहार तलाव, वीणा नगर, घाटीपाडा
’ प्रभाग १०४
आरक्षण – नागरिकांचा मागासवर्ग
लोकसंख्या – ५९,०९७
प्रभाग क्षेत्र – तांबे नगर, इंदिरा नगर, सिद्धार्थ नगर
’ प्रभाग १०५
आरक्षण – सर्वसाधारण महिला
लोकसंख्या – ५२,९६२
प्रभाग क्षेत्र – गवाणवाडा, नीलम नगर, सज्जनवाडी, पाटील नगर, डॉ. आंबेडकर नगर
’ प्रभाग १०६
आरक्षण – नागरिकांचा मागासवर्ग
लोकसंख्या – ४९,९५६
प्रभाग क्षेत्र – हरिओम नगर, म्हाडा कॉलनी, डम्पिंग्स सॉल्ट लेक, टाटा कॉलनी, नवघर
’ प्रभाग १०७
आरक्षण – सर्वसाधारण महिला
लोकसंख्या – ६१,२३५
प्रभाग क्षेत्र – नाहूर गावठाण, मुलुंड बेस्ट बस आगार, सेंट पॉल कॉलनी
’ प्रभाग १०८
आरक्षण – खुला
लोकसंख्या – ५७,१४२
प्रभाग क्षेत्र – राहुल नगर, मोती नगर, हनुमानपाडा, आशा नगर
‘प्रगत परिसर व्यवस्थापन’ या भागात उपलब्ध नाही. त्याला पर्याय म्हणून पालिका अधिकारी या परिसरातील सामाजिक संस्थांच्या बैठका घेऊन समस्यांचा आढावा घेत होते. परंतु गेल्या वर्षभरापासून बैठकाच घेण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे रस्ता, कचरा, दिवाबत्ती आदींविषयी तक्रारी करता येत नाहीत. स्थानिक मतदारांना विभाग कार्यालयात त्यांच्या नगरसेवकांची माहिती उपलब्ध व्हायला हवी. काही ठिकाणी अनधिकृत झोपडय़ा तोडण्यात आल्या. पण काही दिवसांमध्ये तेथे दुपटीने झोपडय़ा उभ्या राहिल्या. याबाबत लेखी आणि ऑनलाइन तक्रार करूनही त्यांची दखल घेतली गेलेली नाही.
– लक्ष्मीदास ठक्कर, ‘अग्नी’ संस्था
मुलुंड परिसरातील झोपडपट्टय़ा बकाल झाल्या असून स्वच्छ पाणी, स्वच्छता, शौचालय आदी सुविधांपासून झोपडपट्टीवासीय वंचित आहेत. असे असताना झोपडपट्टी सुधार निधी उच्चभ्रूंच्या वस्त्यांमध्ये वापरून अनेक नागरी कामे करण्यात आली आहेत. त्यामुळे झोपडपट्टय़ांमध्ये कामेच झालेली नाहीत. टोलनाक्यामुळे नवघर रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी होत असून टोल नाका पुढे काही अंतरावर उभारण्याची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
– रवी नाईक, समाजसेवक
मुलुंड कचराभूमीप्रमाणेच वाहतूक कोंडी हा एक मुलुंडकरांसाठी ज्वलंत प्रश्न बनला आहे. कचराभूमी आणि वाहतूक कोंडीमुळे पर्यावरणाचे प्रश्न निर्माण होत असून त्याचे परिणाम मुलुंडवासीयांना भोगावे लागत आहेत. परंतु हे दोन्ही प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने कोणत्याच हालचाली होताना दिसत नाहीत.
– शिवाली विश्वेश शिरगावकर, गृहिणी, मुलुंड