मुंबई : प्रदूषणमुक्त प्रवास आणि इंधनावरील खर्च कमी करण्यासाठी एसटी महामंडळाची विजेवर धावणारी पहिली वातानुकूलित ‘शिवाई’ बस १ जूनपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे. पहिली बस पुणे-अहमदनगर मार्गावर धावणार आहे. या गाडीचे भाडे २७० रुपये असल्याची माहिती एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ‘शिवाई’चा लोकार्पण सोहळा पुणे येथे होणार आहे. तर एसटी अमृतमहोत्सवी वर्षांत पदार्पण करत असून त्यानिमित्ताने पुण्यातील बालगंधर्व सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. पुणे-अहमदनगर-पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या ‘शिवाई’च्या दिवसाला सहा फेऱ्या होतील. एका कंपनीकडून प्रथम ५० ‘शिवाई’ बस घेण्यात येतील. त्यानंतर आणखी १०० ‘शिवाई’ बस येत्या ऑगस्टपर्यंत ताफ्यात समाविष्ट होतील. ५० पैकी दहा बस पुणे-अहमदनगरबरोबरच पुणे ते औरंगाबाद मार्गावर चालवण्याचे नियोजन आहे. याशिवाय १२ बस पुणे-कोल्हापूर, १८ बस पुणे-नाशिक, १० बस पुणे-सोलापूर मार्गावर चालवण्यात येतील. एका चार्जिगमध्ये २५० किलोमीटपर्यंत धावण्याची या बसची क्षमता आहे. या बसची लांबी १२ मीटर असून टू बाय टू आसन व्यवस्था आहे. बसमध्ये एकूण ४३ आसने असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा