करोनाबळींच्या अंत्यविधीसाठी विद्युतदाहिन्या अपुऱ्या; सरासरी पाच तासांची प्रतीक्षा

इंद्रायणी नार्वेकर, लोकसत्ता 

मुंबई : करोनाच्या रुग्णांची संख्या वाढू लागल्याने रुग्णालयांत अधिकाधिक खाटांची व्यवस्था करण्यात सरकारी यंत्रणा गुंतलेली असताना मुंबईत वाढत्या करोनाबळींमुळे मृतदेहांवरील अंत्यसंस्काराचाही प्रश्न निर्माण झाला आहे. करोनामुळे मरण पावलेल्यांचे मृतदेह विद्युतदाहिनीतच जाळावे लागत असल्यामुळे ठरावीक स्मशानभूमीत अंत्यसंस्कारांसाठी अक्षरश: पाच ते सहा तासांची प्रतीक्षा करावी लागत आहे.

मृतदेह अंत्यसंस्कारासाठी येत असल्यामुळे ताण वाढल्याने चेंबूरच्या चरई आणि शिवाजी पार्क स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीत काही दिवसांपूर्वी बिघाड झाला होता. विद्युतदाहिनीची सोय असलेल्या ठरावीक स्मशानभूमीत गेल्या काही दिवसांपासून मोठय़ा संख्येने मृतदेह रुग्णवाहिकेतून आणले जात आहेत. करोनाबाधिताचा मृतदेह विद्युतदाहिनीतच जाळावा लागत असल्यामुळे ज्या स्मशानभूमीत विद्युतदाहिनी किंवा गॅसदाहिनी आहे अशा ठिकाणी मृतदेहांवर अंत्यसंस्कार होण्याकरिता कमीत कमी दोन-अडीच तास ते पाच-सहा तास लागत आहेत. त्यामुळे ठरावीक स्मशानभूमीच्या बाहेर रुग्णवाहिका अनेक तास रांगेत उभ्या असल्याचे चित्र दिसते आहे. काही दिवसांपूर्वी बोरिवलीतील एका स्मशानभूमीबाहेर मृतदेह घेऊन आलेल्या रुग्णवाहिकांच्या अक्षरश: रांगा लागल्याची ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमांवर फिरत होती. शिवाजी पार्क, भोईवाडा, वरळी, चरई, रे रोड, सायन, टागोर नगर, ओशिवरा, डहाणूकर वाडी, बोरिवलीतील दौलत नगर येथील स्मशानभूमीत विद्युतदाहिनीतील अंत्यसंस्कारासाठी असाच वेळ लागत असल्याचे चित्र आहे.

 

विद्युतदाहिनीवरील प्रक्रियेस वेळ

शिवाजी पार्क स्मशानभूमीत एका वेळी सहा मृतदेहांवर पारंपरिक पद्धतीने लाकडावर अंत्यसंस्कार करता येतील अशी सोय आहे, तर दोन विद्युतदाहिनी आहेत. त्यापैकी विद्युतदाहिनीसाठी अनेकदा थांबावे लागते. त्यामुळे आम्ही नोंदणी करण्यापूर्वीच किती तास वेळ लागेल त्याची कल्पना देतो. त्यांची थांबण्याची तयारी असेल तरच नाव नोंदवून घेतो. नाही तर मग रुग्णवाहिका दुसऱ्या स्मशानभूमीत निघून जातात, अशी माहिती येथील एका कर्मचाऱ्याने दिली. पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कारासाठी वेळ लागत नाही; परंतु विद्युतदाहिनीत एका मृतदेहावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्याचे तापमान कमी झाल्यावर साफसफाई करून दुसऱ्या मृतदेहाचा क्रमांक लागेपर्यंत दोन तास लागतात, असेही त्यांनी सांगितले. करोनाकाळात दर दिवशी कोविड आणि नैसर्गिक असे मिळून २५ मृतदेह तरी अंत्यसंस्कारासाठी येतात, असेही त्यांनी सांगितले.

बाणगंगेवर अंत्यविधी

एका विद्युतदाहिनीत झालेला बिघाड आणि अंत्यसंस्कारासाठी मोठय़ा संख्येने आलेले पार्थिव यामुळे मरिन लाईन्स येथील चंदनवाडी स्मशानभूमीत पेच निर्माण झाला होता. अखेर काही मृतदेह अंत्यसंस्कारासाठी बाणगंगा स्मशानात पाठवणी करण्याची वेळ ओढवली. परिणामी, चंदनवाडी स्मशानभूमीतून निघालेल्या अंत्ययात्रा ऑपेरा हाऊसमार्गे मलबार हिल परिसरातील बाळगंगा स्मशानभूमीत पोहोचल्यानंतर पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

४९  पालिकेच्या एकूण हिंदू स्मशानभूमी

२० खासगी हिंदू स्मशानभूमी 

विद्युतदाहिनीची सोय असलेल्या स्मशानभूमी

* चंदनवाडी  * वैकुं ठधाम * भोईवाडा * हेन्स रोड * शिवाजी पार्क ल्ल ओशिवरा, * डहाणूकर वाडी * दौलतनगर, * चरई

भोईवाडय़ावर भार

केईएम, टाटा आणि शिवडी टीबी ही तिन्ही रुग्णालये एकाच परिसरात असल्यामुळे भोईवाडा स्मशानभूमीतही मोठय़ा प्रमाणावर अंत्यसंस्कारासाठी वेळ लागतो आहे. करोनाबाधित मृतदेह खाली ठेवता येत नसल्याने अंत्यसंस्कार पूर्ण होईपर्यंत रुग्णवाहिका तिथेच थांबवून ठेवावी लागते. त्यामुळे कधीकधी एका रुग्णवाहिकेतून दोन-तीन मृतदेह आणले जातात.

काही ठरावीक स्मशानभूमीवर ताण येत होता हे खरे आहे; पण मुंबईत पालिकेच्या अनेक स्मशानभूमी आहेत अनेक ठिकाणी विद्युत व गॅसदाहिनी आहेत. त्याची यादीच आम्ही आता रुग्णालयांना दिली आहे. तसेच एका समन्वयकाची नेमणूक करून मृतदेह सर्व स्मशानभूमीवर समप्रमाणात जातील याची काळजी घेत आहोत. 

– डॉ. मंगला गोमारे, उपकार्यकारी आरोग्य अधिकारी