मुंबई : इंधनावरील होणारा खर्च टाळण्यासाठी आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी डिझेल इंजिनावर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना विदयुत इंजिन जोडण्यात येत आहे. मुंबईतून सुटणाऱ्या राज्यराणी, देवगिरी, हिंगोली जनशताब्दीला डिझेलऐवजी विद्युत इंजिन जोडण्यात आले आहे. त्यामुळे इंधनाची बचत होणार असून, इंधनावरील कोट्यवधी रुपयांचा खर्च वाचणार आहे. तसेच धूर सोडणारे डिझेल इंजिन बंद केल्याने पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन होणार आहे.
भारतीय रेल्वेला जगातील सर्वात मोठी हरित रेल्वे बनवण्याचा संकल्प करण्यात आला असून २०३० पूर्वी ‘निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जक’ बनण्याच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. विदयुतीकरणामुळे इंधन खर्चात बचत, पर्यावरणाचे संवर्धन आणि रेल्वेची गती वाढल्याने प्रवाशांच्या वेळेची बचत होते. यासाठी भारतीय रेल्वेवरील अनेक ठिकाणी विद्युतीकरणाचे काम वेगात सुरू आहे. यामध्येच दक्षिण मध्य रेल्वे विभागाने डिझेल इंजिन कमी करून विद्युत इंजिन वापरावर भर दिला आहे. यात मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातून सुटणाऱ्या रेल्वेगाड्यांना विद्युत इंजिन जोडण्यात येत आहे.
आणखी वाचा-मुंबई : उपकरप्राप्त अतिधोकादायक इमारतीत अजूनही १७५ कुटुंबाचे वास्तव्य
निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जनाच्या दिशेने मध्य रेल्वेने पावले उचलली असून मध्य रेल्वेच्या मुंबई विभागासह इतर विभागाचे १०० टक्के विद्युतीकरण करण्यात आले. परंतु, तरीही मुंबई विभागातून सुटणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या अद्यापही डिझेलवर धावत होत्या. परिणामी, डिझेलवर मोठ्या प्रमाणावर खर्च होत आहे. वातावरणात कार्बनचे उत्सर्जन होत असल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. मुंबई – मनमाड मार्गे जाणाऱ्या दक्षिण मध्य रेल्वेच्या प्रामुख्याने नांदेड मंडळाकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या डिझेल इंजिनवर धावत होत्या. मात्र, या डिझेलवर चालविण्यात येणाऱ्या रेल्वेऐवजी विद्युत रेल्वे चालविणे हे आर्थिक आणि पर्यावरणीयदृष्ट्या फायदेशीर असल्याने राज्यराणी, देवगिरी, हिंगोली जनशताब्दीला डिझेलऐवजी विद्युत इंजिन जोडण्यात आले.
आणखी वाचा- केवळ ११ तास आधी परीक्षा पुढे ढकलली… नीट पीजी परीक्षेच्या अनिश्चिततेमुळे विद्यार्थी त्रस्त!
या डिझेल इंजिनाला विद्युत इंजिन जोडले
- गाडी क्रमांक १७०५७ सीएसएमटी ते लिंगमपल्ली देवगिरी एक्स्प्रेस
- गाडी क्रमांक १७०५८ लिंगमपल्ली ते सीएसएमटी देवगिरी एक्स्प्रेस
- गाडी क्रमांक १७६११ नांदेड ते सीएसएमटी राज्यराणी एक्स्प्रेस
- गाडी क्रमांक १७६१२ सीएसएमटी ते नांदेड राज्यराणी एक्स्प्रेस
- गाडी क्रमांक १२०७१ सीएसएमटी ते हिंगोली जनशताब्दी एक्स्प्रेस
- गाडी क्रमांक १२०७२ हिंगोली ते सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस