देशाची अर्थव्यवस्था अडचणीत असताना आता वाढीव वीजदरांमुळे राज्यातील औद्योगिक क्षेत्राचे अर्थकारणही ढासळण्याची भीती आहे. उद्योगांचा वीजदर प्रतियुनिट सरासरी सव्वा ते दीड रुपयाने वाढण्याची चिन्हे असून त्यामुळे महाराष्ट्रातील उद्योगांचा इतर राज्यांशी स्पर्धेत निभाव लागणे कठीण होणार आहे. परिणामी राज्यातील औद्योगिक क्षेत्रावर संक्रांत कोसळण्याची भीती आहे. तर ‘महावितरण’ला औद्योगिक ग्राहक गमावण्याची भीती वाटू लागली आहे. राज्य वीज नियामक आयोगाने महानिर्मिती आणि महापारेषण या कंपन्यांच्या तीन वर्षांतील थकलेल्या रकमांची एकत्रित वसुली करण्यास परवानगी दिल्यामुळे होणाऱ्या वीजदरवाढीचा सर्वात मोठा झटका उद्योगक्षेत्राला बसणार आहे. तीन वर्षांतील ही थकित वाढ ही सुमारे ५३४३ कोटी रुपयांच्या घरात जाणार आहे. अवघ्या सहा महिन्यांत या वाढीव वीजदरांची वसुली होणार आहे.
आधीच राज्यातील औद्योगिक ग्राहकांचे वीजदर हे शेजारील राज्यांच्या तुलनेत प्रति युनिट सुमारे दोन-तीन रुपयांनी जास्त आहेत. आता या दरवाढीमुळे औद्योगिक ग्राहकांचा वीजदर सुमारे दीड रुपयांनी वाढण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे आर्थिक मंदीशी झगडत असलेल्या राज्यातील औद्योगिक ग्राहकांचे कंबरडेच मोडणार आहे. देशातील इतर राज्यांतील स्पर्धक कारखानदारांच्या तुलनेत महाराष्ट्रातील उत्पादनाचा खर्च आणखी वाढेल. परिणामी राज्यातील औद्योगिक क्षेत्रात अस्थिरता आणि अशांतता निर्माण होण्याची भीती असल्याचे राज्य वीजग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी सांगितले.‘महावितरण’चे अधिकारीही यामुळे चिंतित आहेत. औद्योगिक ग्राहकांचा वीजदर चांगलाच वाढणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा