विजेच्या मागणी आणि पुरवठय़ात होणाऱ्या तफावतीनुसार काही वीज अल्पकालीन कराराद्वारे खरेदी करावी लागते. ही वीज जाहीर निविदा काढून खरेदी केली जाते आणि त्याचे दर स्पर्धात्मक असून भरमसाट अजिबात नाहीत, असे ‘महावितरण’ कंपनीने कळविले आहे.
‘लोकसत्ता’च्या ८ डिसेंबरच्या आवृत्तीत ‘काँग्रेस-राष्ट्रवादीत ‘ऊर्जे’वरून कलगीतुरा’ या मथळ्याखाली आलेल्या वृत्ताबद्दल अधिक स्पष्टीकरण देताना ‘महावितरण’ने म्हटले आहे की, जेव्हापासून वीजखरेदी करण्यात आली तेव्हापासूनच्या खरेदीशी संबंधित असलेली कागदपत्रे उपलब्ध आहेत. ‘महावितरण’ला मिळालेले दर आणि देशात इतरांना मिळालेले दर याचा तौलनिक अभ्यास त्यावरून करता येईल. राज्याला लागणारी बहुतेक सर्व वीज खरेदी कराराद्वारे विविध स्रोतांकडून घेण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. मात्र इंधन, हवामानात होणारे बदल यामुळे विजेच्या मागणीत ५०० ते २००० मेगाव्ॉटचा फरक पडतो. त्यामुळे अल्पकालीन कराराद्वारे काही वीज खरेदी करावी लागते. केवळ खासगी क्षेत्रातच नाही तर सार्वजनिक क्षेत्रातही नव्याने येणाऱ्या विद्युत संचाचे दर पूर्वीच्या तुलनेत जास्तच राहणार असून या दरांच्या तुलनेत अल्पकालीन खरेदीचे दर स्पर्धात्मक आणि अनेकदा कमी असतात, असेही ‘महावितरण’ने म्हटले.    

Story img Loader