कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांतील रहिवाशांना सरकारची हमी

कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांमध्ये गेली कित्येक वर्षे कर्नाटकमधून येणारे हत्ती शेतात धुडगूस घालून मालमत्तेचेही नुकसान करतात. शेत आणि फळबागांमधील हानीबाबत आत्तापर्यंत नुकसानभरपाई दिली जात होती, मात्र मालमत्ता उद्ध्वस्त झाल्यास नागरिकांना कोणताही दिलासा मिळत नव्हता. आता वन्य हत्तींपासून शेतपिकांबरोबरच अन्य मालमत्तेची हानी झाल्यासही नुकसानभरपाई देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

महाराष्ट्रात वन्य हत्तींचा नैसर्गिक अधिवास नाही. मात्र, कर्नाटकातून काही हत्ती महाराष्ट्रात आल्यानंतर ते कर्नाटकात परत न जाता महाराष्ट्रातच राहतात. हे वन्य हत्ती कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांमध्ये शेतपिकांचे भरमसाठ नुकसान करतात. लोकप्रतिनिधी आणि लोकभावना विचारात घेऊन सरकारने आता वन्य हत्तींकडून मालमत्तेचे नुकसान झाल्यास अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळेल, असा विश्वास वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.

ज्या शेतकऱ्यांचे वन्य हत्तींपासून नुकसान झाले आहे, त्यांनी सर्व कागदपत्रे आणि पुराव्यांसह जवळच्या वनरक्षक, वनपाल, वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्यापैकी कोणाकडेही घटना घडल्यापासून तीन दिवसांच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे. वन जमिनीवर अतिक्रमण करून शेती करण्यात येत असेल तर संबंधित व्यक्ती अर्थसाहाय्य मिळण्यास पात्र ठरणार नाही, असे याबाबतच्या आदेशात (जीआर) नमूद करण्यात आले आहे.

वन्य हत्तींचे स्वरूप ..

सह्य़ाद्री पर्वतरांगांत दहा हजार हत्तींचा वावर अहे. कर्नाटक राज्यात जवळपास सहा हजार हत्ती आहेत, तर उत्तर कर्नाटक व अणशी-दांडेली भागात ५०-६० हत्तींचा नियमित वावर असत. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील ४९ टक्के क्षेत्र वनाच्छादित असले तरी त्यापैकी ८९ टक्के वन हे खासगी मालकीचे आहे. केवळ ११ टक्के क्षेत्रच प्रत्यक्ष वनविभागाकडे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात हत्तीसाठी सलग जंगलपट्टा आज अस्तित्वात नाही. लहान लहान गावे आणि विखुरलेल्या वस्त्यांमुळे येथे रानटी हत्तींकडून शेतीची नासधूस होते. त्याचबरोबर मालमत्तेचेही नुकसान होते. २००५ ते २०१५ या काळात राज्यात हत्तींमुळे १३ माणसांना प्राण गमवावे लागले.

होणार काय?

वन्य हत्तींमुळे शेती अवजारे आणि उपकरणे तसेच बैलगाडीचे नुकसान झाल्यास बाजारभावाच्या ५० टक्के किंवा पाच हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम नुकसानभरपाई म्हणून दिली जाईल. तर संरक्षक भिंत आणि कुंपण याचे नुकसान झाल्यास बाजारभावाच्या ५० टक्के किंवा १० हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती दिली जाईल.