मुंबई : शहरी नक्षलवाद प्रकरणी जामिनावर असलेले प्रा. आनंद तेलतुंबडे यांनी एप्रिल आणि मे महिन्यात व्याख्यानासाठी परदेशी जाण्यास मागितलेल्या परवानगीला राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) गुरुवारी विरोध केला. तेलतुंबडे यांना परदेशी जाण्यास परवानगी दिल्यास ते फरारी होण्याची शक्यताही एनआयएने व्यक्त केली.

खटला टाळण्यासाठी डॉ. तेलतुंबडे फरारी होऊ शकतात आणि परदेशात आश्रय घेऊ शकतात, असेही एनआयएने न्यायालयाला सांगण्याचा प्रयत्न केला. तसेच डॉ. तेलतुंबडे यांनी उच्च न्यायालयात येण्याआधी सर्वप्रथम विशेष न्यायालयाकडे अर्ज करणे अपेक्षित आहे, असेही एनआयएने तेलतुंबडे यांच्या याचिकेला विरोध करताना म्हटले. एनआयएच्या या प्राथमिक आक्षेपांच्या पार्श्वभूमीवर न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठाने महानिबंधक कार्यालयाला तेलतुंबडे यांच्या याचिकेची पडताळणी करण्याचे आणि ती योग्य खंडपीठासमोर सूचीबद्ध करण्याचे आदेश दिले.

म्हणून एनआयएचा विरोध

एनआयए आणि भारतातील अन्य तपास यंत्रणांच्या यादीत फरारी असलेल्या काही आरोपींनी परदेशात आश्रय घेतला आहे. या आरोपींना परत भारतात आणण्यासाठी कायदेशीर अडथळा निर्माण झाला आहे. हा पूर्वानुभव पाहता तेलतुंबडे यांनाही परदेशी जाण्याची परवानगी दिल्यास तेही फरारी होण्याची आणि परदेशात आश्रय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेलतुंबडे हे सीपीआय (माओवादी) या बंदी घातलेल्या संघटनेचा सक्रिय आणि ज्येष्ठ सदस्य असल्याचा दावाही एनआयएने प्रतिज्ञापत्रात केला आहे. तसेच, तेलतुंबडेंच्या अर्जाला विरोध केला आहे.

तेलतुंबडे यांची मागणी

ॲमस्टरडॅम विद्यापीठाने एप्रिलमध्ये होणाऱ्या चार आठवड्यांच्या कार्यक्रमासाठी तेलतुंबडे यांची निवड केली आहे. त्यावेळी पीएच.डी. उमेदवारांसोबत चर्चासत्रांनाही ते उपस्थित राहतील, व्याख्याने देतील, असेही याचिकेत म्हटले आहे. तेलतुंबडे यांना १६ एप्रिल रोजी नेदरलँड्समधील लीडेन विद्यापीठाने व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित केले आहे. शिवाय, लंडनमधील नॉटिंगहॅम ट्रेंट विद्यापीठानेही त्यांना मे महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यांसाठी स्कॉलर-इन-रेसिडेन्स म्हणून आमंत्रित केले आहे. याचिकेत ऑक्सफर्ड विद्यापीठासह लंडनमधील आणखी तीन विद्यापीठांनी निमंत्रण दिल्याचा उल्लेख आहे.