मुंबई : शहरी नक्षलवादाच्या आरोपाप्रकरणी सध्या नजरकैदेत असलेले मानवाधिकार कार्यकर्ते गौतम नवलखा हे बंदी घालण्यात आलेल्या सीपीआय (माओवादी) या संघटनेचे सक्रिय सदस्य होते. तसेच अमेरिकेत अटक केलेल्या आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संघटनेच्या हस्तकाशी त्यांचे संबंध होते. या आयएसआय हस्तकाला माफी देण्याच्या मागणीसाठी नवलखा यांनी अमेरिकेतील न्यायालयाला पत्र लिहिले होते, असा दावा राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) उच्च न्यायालयात केला.
नवलखा यांनी उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका केली आहे. त्यावर एनआयएने वकील संदेश पाटील यांच्यामार्फत उत्तर दाखल करताना उपरोक्त दावा केला. त्यात नवलखा यांनी राष्ट्रीय सुरक्षा, एकता आणि सार्वभौमत्वावर थेट परिणाम करणारे कृत्य केल्याचा दावा करण्यात आला आहे.
नवलखा हे गुलाम नबी फाई याच्या नियमित संपर्कात होते. फाई याने अमेरिकेत आयोजित केलेल्या ‘काश्मिरी अमेरिकन काऊन्सिल कॉन्फरन्स’ला संबोधित करण्यासाठी तीनवेळा अमेरिकेला गेले होते. आयएसआय आणि पाकिस्तान सरकारकडून निधी स्वीकारल्याच्या आरोपांतर्गत फाई याला जुलै २०११ मध्ये अमेरिकेच्या एफबीआयने अटक केली होती. नवलखा यांनी फाई याच्यावर अमेरिकी न्यायालयात खटला सुरू असताना तो चालवणाऱ्या न्यायधीशांना पत्र लिहिले होते, असे एनआयएने सांगितले.
नक्षलवादी-माओवाद्यांना सहकार्य केल्याचा आरोप
फाई याने नलवखा यांची आयएसआयच्या प्रमुखाशी ओळख करून दिली होती. त्यातूनच नलवखा यांचे फाई आणि आयएसआयशी संबंध असल्याचे स्पष्ट होते. याशिवाय नवलखा यांनी काश्मीर फुटीरतावादी आणि माओवादी चळवळीशी संबंधित मुद्दय़ांवर वेगवेगळय़ा मंचांवर व कार्यक्रमांमध्ये भाषणे दिल्याचा दावाही एनआयएने केला आहे. नवलखा यांच्यावर सीपीआय (माओवादी) संघटनेच्या छुप्या कारवायांसाठी तरुणांची भरती करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. नवलखा यांनी आपल्या गुन्हेगारी कारवायांना मानवी हक्कांसाठीचे काम म्हणून दाखवल्याचा दावाही एनआयएने केला.