मुंबई : अंदाजे दीड लाख गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांची पात्रता निश्चित करण्याचे काम सध्या म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून सुरु आहे. यासाठी म्हाडा भवनात विशेष अभियान राबवण्यात येत असून आवश्यक ती कागदपत्रे जमा करून घेतली जात आहेत. कागदपत्रे सादर करण्यासाठी कामगार आणि त्यांच्या वारसांनी मोठ्या संख्येने म्हाडा भवनात गर्दी केली आहे. त्यामुळे मुंबई मंडळाच्या पणन विभागात येणाऱ्या-जाणाऱ्या इतर नागरिकांची गैरसोय होत आहे. ही बाब लक्षात घेता आता मंडळाने विशेष अभियान म्हाडा भवनाऐवजी वांद्रे येथील समाज मंदिर सभागृहात घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता उद्या, बुधवारपासून सकाळी साडेदहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत हे अभियान सुरु राहणार आहे.
म्हाडा मुंबई मंडळाच्या सोडतीच्या धर्तीवर सोडतीपूर्वीच गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांची पात्रता निश्चिती करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. काही गिरणी कामगार संघटनांची तशी मागणी होती. त्यानुसार दीड लाख अर्जदारांची पात्रता निश्चिती प्रक्रिया १४ सप्टेंबरपासून सुरु करण्यात आली आहे. यासाठी विशेष अभियान राबविण्यात येत आहे.
हेही वाचा – मुंबई : शाकाहारींसाठी राखीव जागांवर मांसाहार करणाऱ्या विद्यार्थ्यांना दहा हजारांचा दंड
ऑनलाइन पद्धतीने पात्रता निश्चितीसाठीची आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे अवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी स्वतंत्र अॅप तयार करण्यात आले असून म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावरही कागदपत्रे जमा करता येणार आहेत. म्हाडाच्या कार्यालयात जाण्याची गरजच भासणार नाही अशी व्यवस्था असताना कामगार आणि वारस ऑनलाईन पद्धतीला नापसंती दर्शवत ऑफलाईन अर्थात म्हाडा भवनात जाऊन कागदपत्रे जमा करण्यास प्राधान्य देताना दिसत आहेत. त्यामुळे मुंबई मंडळाच्या पणन विभागात मोठ्या संख्येने गर्दी होत आहे. पणन विभागातील दैनंदिन कामकाजावर त्याचा परिणाम होत आहे.
हेही वाचा – राज्यात डोळे येण्याची साथ आटोक्यात
या पार्श्वभूमीवर आता विशेष अभियान म्हाडा भवनाऐवजी वांद्रे पूर्व येथील समाज मंदिर सभागृहात घेण्यात येणार असल्याचे मंडळाने जाहीर केले आहे. बुधवारपासून सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.०० या कालावधीमध्ये कामगारांना समाज मंदिर येथे जात कागदपत्रे जमा करता येणार आहेत.