लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील परळ आणि प्रभादेवीला जोडणारा १२५ वर्ष जुना ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पूल २५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्गाची व्यवस्था केली आहे. वाहतूक पोलिसांनी याबाबतचा आदेश बुधवारी जारी केला.

एमएमआरडीएने या पुलाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला होता. नवीन पूल बांधण्यासाठी सुमारे दोन वर्षांचा काळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांना पुढील काही काळ मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागू शकते. ही बाब लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्थापन करण्यात येणार आहे. त्याची शुक्रवार, २५एप्रिल रोजी रात्री ९ पासून अंमल बजावणी करण्यात येणार आहे. वाहतूक पोलिसांनी याबाबतचे आदेश बुधवारी जारी केला.

स्थानिक रहिवासी आणि राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी हा पूल पाडण्यास विरोध केला होता. त्यासाठी आंदोलनही करण्यात आले होते. पुलाबाबत नागरिकांच्या हरकतीही मागवण्यात आल्या होत्या. त्या विचारात घेतल्यानंतर प्रभादेवी व परळ परिसरातील रहिवाशांना आपतकालिन स्थितीत रुग्णालयात जाण्यासाठी अडचण निर्माण होऊ नये, यासाठी दोन रुग्णवाहिक तैनात करण्यात येणार आहेत.

वाहतूक व्यवस्थापक पुढील प्रमाणे

अ) पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या वाहनांकरीता

१) दादर पूर्व येथून दादर पश्चिम व दादर मार्केटकडे जाण्यासाठी टिळक पुलाचा वापर करावा.
२) परेल पूर्व येथून प्रभादेवी व लोअर परेल येथे जाण्यासाठी करी रोड पुलाचा वापर करावा. (सकाळी ७ ते दुपारी ३).
३) परेल, भायखळा पूर्व येथून प्रभादेवी, वरळी, कोस्टल रोड व सि-लिंकच्या दिशेने जाण्यासाठी चिंचपोकळी पुलाचा वापर करावा.

ब) पश्चिमेकडून पूर्वकडे जाणाऱ्या वाहनांसाठी

१) दादर पश्चिम येथून दादर पूर्व येथे जाण्यासाठी टिळक पुलाचा वापर करावा.
२) प्रभादेवी व लोअर परेल पश्चिम येथून परेल, टाटा रुग्णालय व के. ई. एम. रुग्णालय येथे जाण्यासाठी करी रोड पुलाचा वापर करावा. (दुपारी ३ ते रात्री ११).
३) कोस्टल रोड व सि-लिंकने व प्रभादेवी, वरळी येथून परेल, भायखळा पूर्व येथे जाण्यासाठी चिंचपोकळी पुलाचा वापर करावा.

महादेव पालव मार्गाच्या (करी रोड रेल्वे ब्रिज) वाहतूक नियोजनाबाबत

प्रवासाचा मार्ग

महादेव पालव मार्ग (करी रोड रेल्वे ब्रिज), कॉम्रेड कृष्णा देसाई चौक (भारत माता जंक्शन) येथून शिंगटे मास्तर चौककडे वाहतूक एक दिशा सुरू राहील. (सकाळी ७ ते दुपारी ३)
महादेव पालव मार्ग (करी रोड रेल्वे ब्रिज) शिंगटे मास्तर चौककडून कॉम्रेड कृष्णा देसाई चौकाकडे (भारत माता जंक्शन) वाहतूक एक दिशा चालू राहील.( दुपारी ३ ते रात्री ११)
महादेव पालव मार्ग (करी रोड रेल्वे पूल) दोन्ही वाहिन्या वाहतुकीसाठी सुरू राहील.(रात्री ११ ते सकाळी ७)

नो पार्किंग मार्ग

१. ना. म. जोशी मार्ग :- कॉम्रेड गुलाबराव गणाचार्य चौक (आर्थर रोड नाका) ते धनमिल नाक्यापर्यंत दोन्ही वाहिन्या

२. सेनापती बापट मार्ग:- संत रोहिदास चौक (एल्फिन्स्टन जंक्शन) ते रखांगी जंक्शनपर्यंत दोन्ही वाहिन्या

३. महादेव पालव मार्ग :- कॉम्रेड कृष्णा देसाई चौक (भारत माता जंक्शन) ते शिंगटे मास्तर चौकापर्यंत दोन्ही वाहिन्या

४. साने गुरूजी मार्ग :- संत जगनाडे चौक ते कॉग्रेड गुलाबराव गणाचार्य चौकापर्यंत (आर्थर रोड नाका) दोन्ही वाहिन्या

५. भवानी शंकर मार्ग :- हनुमान मंदिर, कबुतरखाना ते गोपीनाथ चव्हाण चौकापर्यंत दोन्ही वाहिन्या

६. रावबहादूर एस. के. बोले मार्ग :- हनुमान मंदिर ते पोर्तुगिज चर्चपर्यंत दोन्ही वाहिन्या

७. संपूर्ण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग दोन्ही वाहिन्या.

वाहतुकीसाठी दुहेरी मार्ग सुरू

१ . सेनापती बापट मार्ग :- वडाचा नाका ते फितवाला जंक्शनपर्यंत दुहेरी मार्ग सुरू राहील.