मध्य रेल्वेकडून छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी)नावात महाराज या आदरार्थी शब्दाचा समावेश केल्यानंतर एल्फिन्स्टन स्थानकाचे नाव प्रभादेवी करण्याच्या सूचना पश्चिम रेल्वेकडून संबंधित विभागांना दोन ते तीन महिन्यापूर्वी देण्यात आल्या होत्या. त्यानुसार बदल करण्याची सर्व तयारीही करण्यात आल्यानंतरही त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. अद्याप एल्फिन्स्टनचे नामांतर हे कागदावरच आहे. एल्फिन्स्टनचे प्रभादेवी नामांतर सोहळा रेल्वे मंत्र्याच्या हस्ते करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. रेल्वेमंत्री पियुष गोयल हे २९ सप्टेंबर रोजी मुंबईत असून उपनगरीय रेल्वे मार्गावरील लोकलच्या नविन जादा फेऱ्यांना त्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात येईल. परंतु गोयल यांच्या उदघाटन कार्यक्रमाच्या यादीत प्रभादेवी नामांतर नसल्याने पुन्हा एकदा प्रत्यक्षात नामांतराच्या अंमलबजावणीची प्रतिक्षा करावी लागणार आहे.
सीएसएमटीसह एल्फिन्स्टन स्थानकाच्या नावात बदल करण्यात यावा, अशी मागणी लोकप्रतिनिधींकडून करण्यात आली होती. ही मागणी लक्षात घेता राज्य सरकारकडून मंजुरीही देण्यात आली आणि तसा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्राकडे पाठवण्यात आला. केंद्र सरकारकडूनही त्यानंतर अधिसूचना जारी करण्यात आली. सीएसटी स्थानकाच्या नावात महाराज असा शब्द समाविष्ट करुन सीएसएमटी असा बदल करण्यात आला. त्यानंतर पश्चिम रेल्वेकडूनही एल्फिन्स्टन स्थानकाचे नाव प्रभादेवी करण्यासाठी संबंधित विभागांना सूचना करण्यात आल्या. महत्वाची बाब म्हणजे या स्थानकाचा कोड (लघुरुप)हा पीबीएचडी असा ठरवण्यात आला. परंतु दोन ते तीन महिने उलटूनही एलफिस्टन स्थानकाचे प्रभादेवी नाव अद्याप कागदावरच आहे. तत्कालिन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते एल्फिन्स्टनचे प्रभादेवी नामांतर केले जाणार होते. मात्र उत्तर प्रदेशात दोन ठिकाणी झालेले अपघातानंतर रेल्वे मंत्रालयाच्या कारभारावर टीका झाली. त्यानंतर गोयल यांना रेल्वेमंत्री पद देण्यात आले. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर १ ऑक्टोबरपासून नविन जादा लोकल फेऱ्यांची अंमलबजावणी केली जाणार आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते २९ सप्टेंबर रोजी मुंबईतील एका कार्यक्रमात त्याची घोषणा करण्यात येईल. मात्र गोयल यांच्या हस्ते एलफिस्टनचे प्रभादेवी नामांतराच्या उदघाटनाबाबतकाही निर्णय घेण्यात आलेला नाही. यासंदर्भात पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल गुप्ता यांनी सांगितले की, प्रभादेवीच्या उदघाटनाबाबत काहीएक निर्णय घेण्यात आलेला नाही. २९ सप्टेंबर रोजी फक्त रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते नवीन फेऱ्यांचे उदघाटन होईल.