एल्फिन्स्टनवरील दृश्य खूपच भयानक होते…. काहींना गंभीर दुखापत झाल्याने ते रक्तबंबाळ झाले होते. … काही जण मानसिक धक्का बसल्याने जागीच बसून होते…. काही जण बेशुद्धावस्थेत जमिनीवर पडले होते…ते बघून मी अक्षरशः थरथर कापत होतो, ते दृश्य मला बघवत नव्हते आणि शेवटी मी तिथून ऑफिसला निघालो…. एल्फिन्स्टन स्टेशनजवळ एका कंपनीत काम करणारा धनंजय सहानी सांगत होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंधेरीत राहणाऱ्या २५ वर्षांच्या धनंजय सहानीचे एल्फिन्स्टन येथील इंडिया बुल्सजवळ ऑफीस आहे. गेल्या दीड वर्षांपासून तो एल्फिन्स्टन रोडला येतो. शुक्रवारचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात भयानक आणि थरकाप उडवणारा होता, असे धनंजयने सांगितले. दुर्घटना घडल्यानंतर काही क्षणातच धनंजय एल्फिन्स्टन स्टेशनवर पोहोचला.

धनंजयने ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी बोलताना एल्फिन्स्टनवर नेमकी काय परिस्थिती होती हे सांगितले. धनंजय म्हणतो, आज मला उशिरा जाग आली आणि मी नेहमीपेक्षा १० ते १५ मिनिटे उशिराने एल्फिन्स्टन स्टेशनवर पोहोचलो. मी ब्रिजवर जे चित्र बघितले ते खूपच भयानक होते. मी फार वेळ तिथे थांबू शकलो नाही एवढा मी अस्वस्थ झालो, असे त्याने सांगितले.

एल्फिन्स्टनला पाऊस जोरात सुरु होता. त्यामुळे प्रवासी पुलावरच थांबले. गर्दी वाढत गेली आणि त्यामुळे चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली असावी असे त्याने सांगितले. जखमी आणि रक्तबंबाळ अवस्थेतील प्रवाशांना बघून माझे हात थरथरत होते, असे त्याने सांगितले. मी गेली दीड वर्ष त्या पुलावरुन ये-जा करतो. मध्य आणि पश्चिम रेल्वे अशा दोन्ही मार्गांवरील स्टेशनला जोडणारा हा पुल असल्याने या पुलावर नेहमीच गर्दी असते. या स्थानकांवर नवीन पूल बांधण्याची गरज आहे, पण दुर्दैवाने रेल्वे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आणि आज ही दुर्घटना घडली अशा शब्दांत त्याने नाराजी व्यक्त केली.

शब्दांकन- विश्वास पुरोहित

vishwas.purohit@loksatta.com