मुंबईः प्रसिद्ध विमा कंपनीला तीन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी ई-मेल पाठविण्यात आला आहे. ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीने बीटकॉईनमध्ये खंडणीची मागणी केली असून खंडणी न दिल्यास कंपनीची महत्त्वाची माहिती सार्वजनिक करण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला असून सायबर तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्या मदतीने तपास सुरू आहे.
लोअर परळ येथील पेनिनसुला पार्क येथील कंपनीला आठवड्याभरापूर्वी ई-मेल प्राप्त झाला होता. ई-मेल करणाऱ्या व्यक्तीने कंपनीचा डेटा सार्वजनिक करण्याची धमकी देऊन ४.२ बिटकॉईनची (सुमारे तीन कोटी रुपये) मागणी केली. ती रक्कम न दिल्यास डेटा सार्वजनिक करून कंपनीला नुकसान करू, अशी धमकी ई-मेलमध्ये देण्यात आली आहे. त्यामुळे खंडणीसाठी ई-मेल पाठवणारी व्यक्ती व त्याला कंपनीचा गोपनीय डेटा पुरवणाऱ्यांविरोधात कंपनीने तक्रार केली आहे. त्यानुसार ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कंपनीच्या वतीने जी. पद्माकर त्रिपाठी यांनी मंगळवारी ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३०८ (३), ३५१ (२) सह माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायदा कलम ६६ (क) व ६६ अंतर्गत गुन्हा दाखल केला. कंपनीने स्वतः या प्रकरणातील तपासणी करून पोलिसांना माहिती दिली. आता पोलीस ई-मेलच्या मदतीने तपास करीत आहेत. त्यासाठी सायबर विभागातील सायबर तज्ज्ञ अधिकाऱ्यांचीही मदत घेतली जात आहे. कंपनीसाचा गोपनीय डेटा आरोपीकडे असल्यामुळे कंपनीशी संबंधित व्यक्तीच्या सहभागाबाबतही तपासणी केली जात आहे.
सायबर खंडणीचा प्रकार
सायबर खंडणी हा प्रकार भारताला नवा नाही. परदेशात ‘डेटा थेफ्ट’चे अनेक किस्से गाजले आहेत. ‘डेटा थेफ्ट’च्या संकल्पनेवर हॉलिवुडमध्ये अनेक चित्रपटही बनले आहेत. व्यावसायिक कंपन्यांसोबत सरकारी विभागांतील सर्वर हॅक केल्यास सुरक्षा व्यवस्थेची कशी दाणादाण उडू शकते, याचे चित्रही या चित्रपटांतून उभे करण्यात आले आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात मात्र असे प्रकार सर्रास सुरू असल्याने कंपन्या अनेक विविध पातळ्यांवर दक्षता घेत आहे. पण हॅकर्स त्यावरही मात करातात. अंतर्गत व्यक्तीच्या सहभागामुळे ‘डेटा थेफ्ट’ची प्रकरणे घडतात. त्याद्वारे कंपनीकडून कोट्यावधी रुपयांची खंडणी मागितली जाते. अन्यथा माहिती सार्वजनिक अथवा प्रतिस्पर्धी कंपनींना देण्याची धमकी दिली जाते. मुंबईत यापूर्वी घडलेल्या ‘डेटा थेफ्ट’च्या प्रकरणांमध्ये कंपनीतील माजी कर्मचाऱ्यांनीच डेटा चोरल्याचे प्रमाण अधिक आहे.