मध्य रेल्वेवरील गाड्या तांत्रिक बिघाडामुळे विलंबाने धावत असून लोकल, मेल, एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांमधील आपत्कालीन साखळी खेचल्यामुळे होणारा खोळंबाही वेळापत्रक कोलमडण्यास कारणीभूत ठरत आहे. काही प्रवासी विनाकारण आपत्कालीन साखळी खेचत असून आता हा प्रकार मध्य रेल्वेसाठी नेहमीची डोकेदुखी होऊन बसला आहे. दरम्यान ४ ते १७ जुलै २०२२ या कालावधीत मध्य रेल्वे मुंबई विभागात विनाकारण आपत्कालीन साखळी खेचल्याच्या १२० प्रकरणांची नोंद झाली. या प्रकरणी ७१ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
५०० ते १००० रुपयांपर्यंत दंड किवा एक वर्षापर्यंत शिक्षा –
कोणत्याही गंभीर कारणाशिवाय प्रवाशांनी रेल्वेच्या डब्यातील आपत्कालिन साखळी खेचून गाडी थांबवल्यास रेल्वे अधिनियमातील १४१व्या कलमाचा भंग होतो. विनाकारण आपत्कालीन साखळी खेचणाऱ्या प्रवाशांना ताब्यात घेऊन रेल्वे दंडाधिकाऱ्यांसमोर उभे करण्यात येते. तेथे त्यांना ५०० ते १००० रुपयांपर्यंत दंड किवा एक वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकतो. मात्र दंडात्मक वा शिक्षेची तरतूद असतानाही अनेक प्रवासी विनाकारण आपत्कालीन साखळी खेचतात आणि त्याचा मनस्ताप रेल्वे आणि अन्य प्रवाशांना सहन करावा लागतो. मध्य रेल्वेने जुलैमध्ये केलेल्या कारवाईततून ४२ हजार ६०० रुपये दंड वसूल केला. सीएसएमटी, दादर, कुर्ला, एलटीटी, ठाणे, कल्याण यासह अन्य स्थानकांत या घटना घडत आहेत.
विविध कारणांसाठी साखळी खेचण्याचे प्रकार घडतात –
गाडीचा थांबा नसलेल्या ठिकाणी उतरण्यासाठी, सहप्रवाशाला झालेला विलंब, फलाटावरच थांबणे, फलाटावर सामान विसरणे, गाडीतून मोबाइल खाली पडणे, अपंगाच्या डब्यात अन्य प्रवाशांचा प्रवास यासह विविध कारणांसाठी साखळी खेचण्याचे प्रकार घडतात. मात्र साखळी खेचल्यानंतर गाडी पुन्हा सुरू होण्यासाठी किमान दहा मिनिटे लागतात आणि त्यामुळे लोकल किंवा मेल-एक्स्प्रेसचे वेळापत्रक बिघडते.