मुंबई : स्थळ जोगेश्वरी रेल्वे स्थानक, दिवस बुधवारचा आणि वेळ सकाळी ११.१३ ची. अचानक दोन रेल्वेगाड्यांची टक्कर झाली आणि एकच खळबळ उडाली. घटनास्थळी एनडीआरएफ, रुग्णवाहिका, अग्निशमन दल, रेल्वे पोलीस, शहर पोलीस, संबंधित रेल्वे विभागातील अधिकारी कर्मचारी पोहोचले आणि बचावकार्य हाती घेण्यात आले. दुर्घटनाग्रस्त रेल्वे गाड्यांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. जखमींवर प्रथमोपचार करण्यात आले. एकूणच परिस्थितीमुळे अन्य प्रवाशांचा गोंधळ उडाला. मात्र यंत्रणांनी आपले काम चोख बजावून मदतकार्य पूर्ण केले. दरम्यान, पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागातर्फे जोगेश्वरी रेल्वे स्थानकावर आपत्कालीन कवायती करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बघ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.
पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागात दोन रेल्वेगाड्यांचा मोठा अपघात झाल्यास विविध विभागांनी कसे सतर्क व्हवे, मदतकार्य कसे करावे, कोणती काळजी घ्यावी आदींबाबत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलासह (एनडीआरएफ) संयुक्त कवायतींचे आयोजन करण्यात आले होते. जोगेश्वरी येथे बुधवारी सकाळी ११.१३ वाजता दोन रेल्वेगाड्यांची टक्कर घडवून आणून अपघाताची स्थिती निर्माण करण्यात आली. त्यानंतर एनडीआरएफ, रुग्णवाहिका, अग्निशमन दल, रेल्वे पोलीस, शहर पोलीस, संबंधित रेल्वे विभाग आणि रेल्वेच्या अपघात निवारण ट्रेनला संदेश देण्यात आला. एनडीआरएफने घटनास्थळी पोहचून बचावकार्य सुरू केले. लोकल आणि एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना सुरक्षितरित्या बाहेर काढून जखमींवर प्रथमोपचार करण्यात आले.
हेही वाचा – मुंबई : घरात घुसून महागड्या वस्तू चोरी करणाऱ्या महिलेला अटक
घटनास्थळी दाखल झालेल्या रेल्वेच्या डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. सर्व विभागाने त्वरित प्रतिसाद दिला. संपूर्ण कवायत दुपारी १.०५ वाजता पूर्ण झाली. या कवायतीत ३०० हून अधिक कर्मचारी सहभागी झाले होते. त्यात पश्चिम रेल्वेच्या विविध विभागांतील ९१ जणांचा समावेश होता. तर, एनडीआरएफ ३२, अग्निशमन दल ८, रेल्वे सुरक्षा दल ३२, रेल्वे पोलीस २१, १०८ क्रमांक रुग्णवाहिका २, शहर पोलीस २८ व इतर विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश होता. अशा कवायतींमुळे विविध आपत्ती प्रतिसाद यंत्रणांसह रेल्वेची संयुक्त कार्यवाही सुरळीत होते आणि वास्तवात मोठ्या प्रमाणात मदत होते, असे पश्चिम रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. मुंबई सेंट्रल विभागाने शून्य अपघाताचे उद्दिष्ट ठेवले आहे. तथापि, अशी कोणतीही अनुचित घटना घडल्यास, सज्जता आणि जलद प्रतिसादासाठी या कवायती रेल्वेतर्फे करण्यात येतील, असे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर यापूर्वीही गर्दीच्या ठिकाणी अपघात झाल्यास, रेल्वेगाडीला आग लागल्यास त्वरित बचावकार्य कसे करावे याबाबत एनडीआरएफतर्फे कवायती करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा – मुंबई : मतदान केंद्रावर मोबाइल नेण्यास बंदीच
पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल येथे नुकतीच लोकल रुळावरून घसरल्याची घटना घडली. मुंबई सेंट्रल कारशेडमध्ये रिकामी लोकल प्रवेश करत असताना ही घटना घडली. या दुर्घटनेत लोकलचे दोन डबे रूळावरून घसरले. घटनेच्या वेळी लोकल रिकामी असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवा विस्कळीत झाली होती.