आतापर्यंत सांकेतिक भाषेतून व्यक्त होणाऱ्या विशेष गरजा असलेले तरुण ‘इमोजी’च्या वापरामुळे कमी वेळात प्रभावीपणे व्यक्त होत आहेत. विशेषत: कर्णबधिरांमध्ये या ‘इमोजी’ प्रभावी आणि प्रचलित ठरल्या आहेत. सांकेतिक भाषेतून संवाद साधणाऱ्या विशेष गरजा असणाऱ्या मुलांचे जग भ्रमणध्वनीच्या उदयामुळे विस्तारले गेले असताना काही भ्रमणध्वनी सेवा पुरवठादार कंपन्यांनी अशा मुलांसाठी मोफत संदेश पाठविण्याची योजनाही सुरू केली होती. त्यामुळे या मुलांना संदेश आदानप्रदानातून संवाद साधणे शक्य झाले आहे. मात्र बदलत्या तंत्रज्ञानाचे नव्या रूपातील व्हॉट्सअॅप ‘इमोजी’च्या साहाय्याने या मुलांना कमी वेळात जलद गतीने व्यक्त होता येत आहे.
काळ बदलला, तशी व्यक्त होण्याची माध्यमेही बदलली. विशेष गरजा असणाऱ्या मुलांना इमोजीच्या माध्यमातून एका क्लिकवर मनातील भावना समोरच्यापर्यंत पोहोचविण्याची संधी मिळाली आहे. नोएडाच्या डिफ सोसायटीच्या प्रमुख रुमा रोका यांच्या मते, कर्णबधिर मुलांमध्ये भ्रमणध्वनी वापरण्याचे प्रमाण वाढले असून ते व्हॉट्सअॅपचा वापर करताना मोठय़ा प्रमाणात इमोजीचा वापर करीत असल्याचे आढळून आले आहे. सर्वसामान्य माणसाला आपल्या भावना व्यक्त करणे सहजशक्य असते. आपल्या रागाची आणि आनंदाची तीव्रताही आपण आपल्या आवाजाच्या चढउतारातून सहज व्यक्त करू शकतो. मात्र कर्णबधिर व्यक्तींना ही सोय नसते. सांकेतिक भाषेतून भावनेतील तीव्रता व्यक्त करता येत नाही. राग, आनंद, चीड, रुसणे, ओरडणे या भावना इमोजीच्या माध्यमातून विशेष मुले चांगल्या प्रकारे व्यक्त होत असल्याचे रोका यांनी सांगितले. इमोजीमुळे आपली भावना समोरच्यापर्यंत अचूक पद्धतीने पोहोचवता येते. त्यामुळे तंत्रज्ञानाचा उपयोग या मुलांना व्यक्त होण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी काम करणाऱ्या पुण्याच्या कल्याणी मांडके यांच्या मते, भ्रमणध्वनीमुळे या कर्णबधिर मुलांचा संपर्क वाढला आणि सहज सोपा झाला आहे. बऱ्याचदा ही मुले घरांमध्ये आपल्या पालकांसोबतदेखील व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून बोलतात, चर्चा करतात. मांडके यांनी सांगितलेल्या अनुभवानुसार, त्यांच्या संस्थेतील एक कर्णबधिर मुलगा घराच्या माडीवर अभ्यासाला बसल्यावर मुलाला बोलवायचे असल्यास त्याची आई त्याला व्हॉट्सअॅप करून बोलावते आणि मुलगादेखील व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आईला उत्तरे देतो. या व्यक्त होण्याच्या प्रक्रियेमुळे त्यांच्यातील आत्मविश्वास वाढला असून यामुळे सर्वसामान्यांबरोबर, ज्यांना सांकेतिक भाषा अवगत नसेल अशांसोबत संभाषण करण्यासाठीदेखील याचा उपयोग होत आहे. काही महिन्यांपूर्वी नवीन इमोजी दाखल झाले आहे. याचा विशेष गरजा असलेली मुले पुरेपूर वापर करीत असून भावना व्यक्त करण्याव्यतिरिक्त खाद्यपदरथ, प्राणी, फळे, विद्युत उपकरणे अशा अनेक चिन्हात्मक चित्रांचादेखील वापर मोठय़ा प्रमाणावर केला जात आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा