विधानसभेत डान्सबारबंदीची घोषणा केली आणि गृहमंत्री आर. आर. पाटील आणि कार्यकर्त्यांचे ‘आबा’ रातोरात प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले. २००५ च्या त्या निर्णयाने हॉटेल लॉबी दुखावली. परंतु महाराष्ट्रातील विशेषत: मुंबईतील तमाम महिला वर्गाने आबांना देवच मानले. डान्सबारमुळे तरुण पिढी बरबाद होण्याचा धोका वाढत होता. तरुण पिढीला व्यसनाच्या विळख्यातून वाचविण्यासाठी डान्सबारवर बंदी घालण्याच्या निर्णयाचे आबा समर्थन करीत. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाने पक्षाचा चेहरा म्हणून आबांकडे बघायला सुरुवात केली. आबांची प्रतिमा आम आदमीला आकर्षित करणारी होती. आबा त्या वेळी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते. त्याच वेळी विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या चिंतेचा विषय बनला होता. केंद्राकडून व राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी कोटय़वधी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले होते. योजनांची यादी वाढली होती. परंतु आत्महत्या थांबत नव्हत्या. आबा अस्वस्थ झाले होते. २००८ च्या फेब्रुवारीमध्ये त्यांनी विदर्भातील सहा आत्महत्याग्रस्त जिल्ह्य़ांचा दौरा केला. अकोला, वाशिम व बुलढाणा या तीन जिल्ह्य़ांच्या दौऱ्याच्या वेळी मी त्यांच्याबरोबर होतो. आबांचा दौरा अनेक अर्थाने वेगळा आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारा जसा होता, तसाच प्रशासनातील भ्रष्टाचाराने कुठपर्यंत हातपाय पसरले आहेत, याचा पर्दाफाश करणारा होता. सरकार शेतकऱ्यांसाठी मुबलक योजनांची घोषणा करते. परंतु शेतकऱ्याच्या बांधापर्यंत आणि त्याच्या झोपडीपर्यंत त्या जात नाहीत, त्याला जबाबदार सरकारी अधिकारी-कर्मचारी होते. वाशिम जिल्ह्य़ातील करंजा तालुक्यातील एक गाव. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या झोपडीत आबा गेले. तिथे अक्षरश: ते जमिनीवर बसले. अधिकाऱ्यांचा झोपडीला गराडा पडला होता. दु:खाचा डोंगर कोसळलेल्या शेतकऱ्याच्या विधवेने आबांसमोर भीत भीत एक कैफियत मांडली. शासकीय योजनेतून मिळालेली शेळी मेली. त्याबद्दल भरपाई मिळण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडे शेळी मृत झाल्याचा दाखला हवा होता. मात्र ज्या शेतकऱ्याने आत्महत्या केली होती, त्यामुळे ज्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता, त्यांच्याकडून त्या अधिकाऱ्याने दाखला देण्यासाठी चक्क दोन हजार रुपयांची लाच घेतली होती. हा सारा प्रकार ऐकून आबा क्षणभर सुन्न झाले. दुसऱ्या क्षणाला त्या अधिकाऱ्याला त्यांनी सेवेतून निलंबित करून टाकले. मृदू, भावुक आबांचा तो एकाएकी कठोर झालेला अवतार बघून उपस्थित अधिकारी वर्ग हादरला होता.
मधु कांबळे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा