लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : केईएम रुग्णालयामध्ये २००९-१० पासून रोजंदारी व २०१६-१७ पासून बहुउद्देशीय कामगार चतुर्थश्रेणी पदावर कार्यरत आहेत. मात्र या कर्मचाऱ्यांचे मागील दोन महिन्यांचे वेतनच झालेले नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा मोठा पेच निर्माण झालेला आहे. उसनवारीने व वाढीव व्याजदराने कर्ज घेऊन ते कसाबसा आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे २२ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता सर्व रोजंदारी व बहुउद्देशीय कामगारांनी केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत आणि सर्व अधिकाऱ्यांना गुलाब पुष्प देऊन गांधीगिरीने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
केईएम रुग्णालयामध्ये रोजंदारीवर १५३, तर बहुउद्देशीय कामगार म्हणून २५० कर्मचारी कार्यरत आहेत. हे कर्मचारी नियुक्त झाल्यापासून आपले काम इमानेइतबारे करीत आहेत. मात्र केईएम रुग्णालय प्रशासनाने या कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचे वेतन एप्रिलचा पहिला पंधरवडा उलटला तरी अद्यापपर्यंत दिलेले नाही. त्यामुळे घराचे भाडे, वीजदेयक, घर खर्च, मुलांचे शिक्षण, आई-वडिलांच्या औषधाचा खर्च कसा भागवायचा असा प्रश्न या कर्मचाऱ्यांना पडला आहे.
मागील दोन महिने काम करूनही वेतन न मिळाल्यामुळे त्यांना उसनवारीने व वाढीव व्याजदराने कर्ज घेऊन आपला उदरनिर्वाह चालवावा लागत आहे. त्यामुळे केईएम रुग्णालयात कार्यरत असलेले रोजंदारीवरील १५३, तर बहुउद्देशीय २५० कर्मचाऱ्यांनी २२ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता रुग्णालयाच्या परिसरामध्ये गांधीगिरी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार केईएम रुग्णालयातील अधिष्ठाता डॉ. संगीता रावत आणि अधिकाऱ्यांना गुलाब पुष्प देऊन आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच मुंबई महापालिकेकडून देय असलेले वेतन व अन्य सेवा सवलती यापुढे वेळेत मिळाव्यात अशी विनंती यावेळी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येणार असल्याची माहिती म्युनिसिपल मजदूर युनियनचे सहाय्यक सरचिटणीस प्रदीप नारकर यांनी दिली.
सहा महिने लोटले तरी बोनस नाही
तत्कालीन मुख्यमंत्री व महानगरपालिका आयुक्तांनी सर्व संवर्गातील रोजंदारी, बहुउद्देशीय व अन्य कामगार – कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपये बोनस देण्याची घोषणा केली होती. मात्र दिवाळी होऊन सहा महिने उलटले तरी त्यांना बोनस देण्यात आला नाही. त्याचबरोबर या कर्मचाऱ्यांना किमान वेतनाबरोबर ४९.५८ टक्के लेव्ही देण्याबाबतच्या आयुक्तांच्या निर्देशालाही प्रशासनाकडून हरताळ फासण्यात आला आहे, असे प्रदीप नारकर यांनी सांगितले.