तोटय़ात गेलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेवर म्हणजेच राज्याच्या शिखर बँकेवर २०११ मध्ये प्रशासक नेमल्यानंतर बऱ्यापैकी सुस्थितीत आलेल्या या बँकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आता प्रशासक मंडळाने शाखा स्थलांतराच्या नावाखाली मुंबईतील अनेक शाखा बंद करण्यास सुरुवात केली आहे. या शाखा बंद केल्यानंतर ‘अतिरिक्त’ ठरत असलेल्या कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती घेण्यास सांगण्यात आले आहे. येत्या एप्रिलपासून टिळक नगर, लालबाग, माटुंगा, माहीम, उमरखाडी व पेडर रोड शाखा बंद होणार आहेत.
या बँकेत १६०० च्या आसपास कर्मचारी असून त्यापैकी तब्बल ८०० कर्मचारी कमी करण्याचा प्रशासक मंडळाचा विचार असल्याचे कळते. कर्जवसुली नाही तसेच कार्यक्षमता नाही अशी कारणे पुढे करीत अनेक कर्मचाऱ्यांना स्वेच्छेने राजीनामा देण्यास तर काहींना सक्तीने निवृत्ती घेण्यास सांगण्यात आली आहे.
बँकेच्या मुंबईत ३३, नागपूर येथे ११, राज्यात अकोला, अमरावती, औरंगाबाद, नवी मुंबई येथे शाखा आहेत. यापैकी मुंबईतील अनेक शाखा बंद करण्याचे प्रस्तावित आहे. यापैकी वांद्रे पश्चिम, विलेपार्ले पश्चिम आणि जोगेश्वरी पूर्व येथील शाखा बंद करून त्या अनुक्रमे खार पश्चिम, अंधेरी पश्चिम आणि अंधेरी पूर्व अशा वर्ग करण्यात आल्या. या शाखा नव्या पत्त्यावर स्थलांतरित करण्यात आल्याचा गोंडस दावा बँकेच्या संकेतस्थळावर करण्यात आला आहे.
या बँकेत प्रामुख्याने सहकारी संस्थांची खाती असून बँकेतील अंतर्गत कारभारामुळे आम्हाला विनाकारण दूरवरच्या शाखांमध्ये तंगडतोड करावी लागणार आहे. याबाबत बँकेकडून स्पष्टीकरण मिळाले नाही.
पेडर रोड येथील जुनी शाखाही बंद होणार?