प्रसाद रावकर, लोकसत्ता
मुंबई : मुंबई महापालिकेच्या जल अभियंता विभागातील पाणी वितरण व्यवस्थेत ‘चावीवाला’ पदावरील कर्मचारी महत्त्वाची भूमिका बजावत असतात. या कर्मचाऱ्यांना लोकसभा निवडणुकीच्या कामाच्या नियुक्तीचे आदेश मिळू लागल्याने एकच गोंधळ उडाला आहे. चावीवाले निवडणुकीच्या कामाला जुंपले गेले, तर पाणीपुरवठा कसा करायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आता हे आदेश रद्द करण्यासाटी धावपळ सुरू झाली आहे.
हेही वाचा >>> Lok Sabha Elections 2024 : मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी १६ सदिच्छादूतांची मदत
मुंबईमधील सहा लोकसभा मतदारसंघांत २० मे रोजी मतदान होत असून निवडणुकीच्या कामासाठी विविध यंत्रणांमधील अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात येत आहेत. विविध विधानसभा मतदारसंघांतील सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या कामासाठी महापालिकेच्या जल अभियंता विभागातील कर्मचाऱ्यांच्या नावाने आदेश जारी केले आहेत. यात चावीवाल्यांचाही समावेश असल्याने जल विभागात गोंधळ उडाला आहे. अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तानसा, मोडकसागर, भातसा, विहार, तुळशी या धरणांमधून दररोज ३९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. विविध विभागांतील नागरिकांना निरनिराळया वेळी पाणीपुरवठा करण्यात येतो. यात चावीवाल्यांची भूमिका महत्त्वाची असते. त्यांना तीन पाळयांमध्ये काम करावे लागते. असे असताना मोठया संख्येने चावीवाले निवडणुकीच्या कामासाठी गेल्यास मुंबईकरांना पाणीपुरवठा कसा करायचा, असा प्रश्न महापालिका प्रशासनाला पडला आहे. जलशुद्धीकरण, परिरक्षण, प्रचालन, नियंत्रण आणि पाणी वाटप विभागातील अभियांत्रिकी कर्मचाऱ्यांना लोकसभा निवडणुकीच्या कामातून वगळावे, अशी विनंती महानगरपालिकेने ८ फेब्रुवारी २०२४ रोजी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना पाठविले होते. असे असताना चावीवाल्यांना निवडणुकीच्या कामासाठी हजर राहण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
महत्त्व काय?
* नियोजित वेळेत पाणीपुरवठा सुरू करणे आणि वेळ झाल्यानंतर तो बंद करण्याचे महत्त्वाचे काम चावीवाले करतात.
* किती वेळा चावी फिरवायची त्यांनाच माहीत असते. त्यात छोटीशी चूक झाली तरी पाणीपुरवठयाचे गणित बिघडते. ’सेवा निवृत्तीमुळे चावीवाल्यांची अनेक पदे आधीच रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण आहे.