ठाण्याहून कर्जतकडे जाण्यासाठी रेल्वे यार्डात उभ्या असलेल्या रिकाम्या गाडीच्या डब्याला शुक्रवारी दुपारी साडेचारला आग लागल्याने अफवांचा धूर धुमसत होता. आग विझवण्यासाठी उडालेली धावपळ, बघ्यांची गर्दी आणि अन्य गाडय़ांना धोका पोहोचू नये, यासाठी धीम्या मार्गावरील वाहतूक स्थगित केली गेल्याने अफवांना अधिकच उत आला होता. अखेर या अफवांना आवर घालण्यासाठी रिकाम्या गाडीला आग लागल्याची उद्घोषणा रेल्वेला करावी लागली.
ठाण्याहून कर्जतला जाणारी ही गाडी ठाणे स्थानकातून पाच वाजून ५९ मिनिटांनी सुटणार होती. त्यासाठी रेल्वे स्थानकाबाहेर यार्डात ती उभी होती. दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास या गाडीच्या कल्याणच्या दिशेने असलेल्या डब्यांना अचानक आग लागली आणि कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. तासाभरानंतर ही आग विझविण्यात अग्निशमन दलाला यश आले. खबरदारीचा उपाय म्हणून छत्रपती शिवाजी टर्मिनसकडून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या गाडय़ा जलद मार्गावरून वळविण्यात आल्या होत्या. तसेच मुंबईकडे जाणाऱ्या अनेक धीम्या गाडय़ा जलद मार्गावर वळविल्या गेल्या होत्या. त्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला होता.नियोजनाचे पितळ उघडे : ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक व्यवस्थेत सुधार व्हावा यासाठी उभारण्यात आलेल्या सॅटीस प्रकल्पाचे नियोजन कसे फसले आहे, याचे प्रत्यंतर शुक्रवारी पुन्हा एकदा सर्वाना आले. यार्डातील ही आग विझविण्यासाठी काही मिनिटांत अग्निशमन दलाचे पथक या ठिकाणी पोहोचले. मात्र, सॅटीस आणि पश्चिमेकडील रेल्वे कॉलनीच्या बाजूला झालेल्या बांधकामांमुळे अग्निशामक जवानांना आपल्या गाडय़ा रेल्वे मार्गाच्या दिशेने नेताच येईनात. आग विझविण्यासाठी पाण्याचा वापर करताना उच्च दाबाच्या ओव्हरहेड वायरचा धक्का लागू नये, याची दक्षता घेताना या जवानांच्या अक्षरश: नाकीनऊ आले. सॅटीस परिसरात वाहतूक कोंडीमुळे रेल्वे स्थानकात शिरतानाही अग्निशमन दलाच्या जवानांना कसरत करावी लागली. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत ठाणे स्थानक परिसरातील असुविधांचा आणि ढिसाळ नियोजनाचा कसा अडथळा उभा राहतो, याचे प्रत्यंतर पुन्हा एकदा आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा