‘सिरीअल किसर’ म्हणून एकेकाळी ज्याला हिणवले गेले त्या इम्रान हाश्मीच्या कारकीर्दीची गाडी जरा जास्तच वेगात यशाच्या शिखराकडे धावते आहे. ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’ आणि ‘द डर्टी पिक्चर’ या चित्रपटांच्या यशाने इम्रानवरचा भट्ट कॅम्पचा शिक्का पुसला गेला आणि त्याला बॉलिवूडच्या मुख्य प्रवाहात आणून सोडले. आणि आता इम्रान हॉलिवूडच्या वाटेवर येऊन पोहोचला आहे. २००१ साली ऑस्कर पुरस्कार मिळवणाऱ्या ‘नो मॅन्स लँड’ या चित्रपटाचा दिग्दर्शक डेनिस टॅनोव्हिक याने आगामी चित्रपटासाठी इम्रान हाश्मी आणि संगीतकार प्रीतमची निवड केली आहे.
‘शांघाय’ चित्रपटातील इम्रानची भूमिका पाहून त्याच्या प्रेमात पडलेल्या डेनिसने इम्रानसारखा कलाकार सापडणे कठीण, अशी त्याची स्तुती केली आहे. शिवाय, प्रीतमचे संगीतही आपण ऐकले असून आपल्या चित्रपटासाठी त्याचे संगीत योग्य आहे, असे वाटल्यानेच त्याची निवड केल्याचे डेनिसने प्रसिध्द केलेल्या निवेदनात म्हटले आहे. डेनिसच्या चित्रपटाची निर्मिती दिग्दर्शक अनुराग कश्यप, सिनेमॉर्फिक प्रॉडक्शनच्या प्रशिता चौधरी आणि गुनीत मोंगा यांची सिख्य एंटरटेन्मेट असे तिघे मिळून करणार आहेत.

Story img Loader