तब्बल शंभरहून अधिक गुंड ठार करताना आपण स्वत:हून पुढाकार घेऊन गुन्हा दाखल केला. परंतु लखनभय्या चकमकीच्या गुन्ह्य़ात आपला सहभाग नसतानाही न केलेल्या गुन्ह्य़ाची आपल्याला विनाकारण शिक्षा दिली गेली, असे मत ‘चकमक’फेम माजी पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांनी व्यक्त केले आहे. आपण निर्दोष सुटणार याची खात्री होती. परंतु त्यासाठी विनाकारण साडेतीन वर्षे वाट पहावी लागली, असेही त्यांनी म्हटले आहे. माझ्या कुटुंबीयांना विनाकारण त्रास सहन करावा लागला. त्याची भरपाई कोण देणार, असा सवालही त्यांनी केला आहे.
संघटित गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध आम्ही आघाडी उघडली. तेव्हापासून आयपीएस अधिकाऱ्यांमधील एक विरुद्ध लॉबी आपल्यामागे हात धुवून लागली होती. परंतु आपण कुठल्याही प्रकरणात सापडलो नाही. लखनभय्या प्रकरणात दाखल झालेल्या याचिकेत सुरूवातीला आपले नावही नव्हते. परंतु नंतर घुसवण्यात आले. आपल्याला विनाकारण त्यात गोवण्यात आले, असेही शर्मा यांनी सांगितले.
लखनभय्या चकमक प्रकरणात गोवण्यासाठी माझ्या सव्‍‌र्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी मारण्यात आल्याचे दाखविण्यात आले. परंतु संबंधित रिव्हॉल्व्हर नायगाव येथे जमा केले होते. चकमक झाली तेव्हा आपण घटनास्थळी नव्हतो. तरीही बंदुकीच्या गोळीचा खोटा अहवाल सादर करून गोवण्यात आले. परंतु निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी माझ्या आयुष्यातील साडेतीन वर्षे खर्ची पडली.  आपल्याला पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले. या विरोधात आपण महाराष्ट्र न्यायाधिकरणाकडे धाव घेतली. त्यांनी मला पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश दिले. तूर्तास तरी आपला पोलीस सेवेत पुन्हा येण्याचा विचार नाही. कुटुंबीयांचे जे नुकसान झाले आहे ते मला भरून द्यायचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
*या खटल्यातील तब्बल १, ६६८ पानांच्या निकालपत्रात अतिरिक्त सत्र न्या. व्ही. डी. जाधवार यांनी सरकारी पक्ष प्रदीप शर्माविरोधात ठोस पुरावा सादर करण्यात अपयशी ठरल्याचे म्हटले आहे.
*शर्मा याच्या रिव्हॉल्व्हरमधून लखनभैय्यावर गोळी झाडण्यात आल्याचा मुख्य आरोप सरकारी पक्षाने ठेवला होता. त्यासाठी बॅलेस्टिक अहवालावर सरकारी पक्ष पूर्णपणे अवलंबून होता. मात्र न्यायालयाने हा अहवाल अमान्य केला.
*या प्रकरणी सरकारी पक्षाची मदार कॉल डेटा रेकॉर्ड (सीडीआर), स्टेशन डायरीतील नोंदी, हस्तगत करण्यात आलेले रिव्हॉल्व्हर आणि लखनभैय्या याच्या शरिरातून काढण्यात आलेली गोळी या बाबतच्या पुराव्यांवर अवलंबून होती, असे न्यायालयाने निकालपत्रात नमूद केले आहे. परंतू सीडीआर नोंदींमध्ये शर्मा याचा मोबाइल नंबर आढळणे हा त्याचा या चकमकीतील सहभाग दर्शवत नाही, असे न्यायालयाने मह्टले.
*या बनावट चकमकीचे नेतृत्त्व शर्मा याने केले आणि तो घटनास्थळी हजर होता, हा सरकारी पक्षाचा आरोप होता. मात्र सरकारी पक्षाच्या साक्षीदारांच्या साक्षीतूनही हा आरोप सिद्ध होत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा