लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून महाराष्ट्राला पारंपरिक आणि साहसी खेळांचा इतिहास लाभला आहे. पंजाब, मणिपूरमध्ये तेथील पारंपरिक खेळाच्या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. तसेच, आज छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभाच्या निमित्ताने महाराष्ट्रात प्रथमच शिवकालीन साहसी खेळांचे आयोजन होत आहे. खेळाडूंसाठी ही मोठी सुवर्णसंधी आहे. भारताला प्रत्येक क्षेत्रात आत्मनिर्भर बनविण्यासाठी आपल्याला मातृभाषेसोबतच स्वदेशी खेळांनाही प्रोत्साहन दिले पाहिजे, असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी शनिवारी केले.
वरळी येथील जांबोरी मैदानावर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्रात कुस्ती हा खेळ खूप प्रसिद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वत: घोडेस्वारी, तलवारबाजी, भालाफेक अशा खेळांमध्ये प्राविण्य मिळविले होते. रामदास स्वामींनी युवा पिढीला व्यायामाचे महत्त्व सांगितले. छत्रपती शाहू महाराजांनी कुस्तीसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या. याच महाराष्ट्राच्या मातीतून खाशाबा जाधव यांच्यासारखे आंतरराष्ट्रीय मल्ल नावारुपाला आले. महाराष्ट्राला पारंपरिक खेळांची परंपरा आहे. मात्र आपल्याकडे अशाप्रकाराचे व्यासपीठ नव्हते. पण आता महाराष्ट्र शासन, मुंबई महानगरपालिका व क्रीडा भारतीने या महाकुंभाचे आयोजन करून ती कमतरता भरून काढली आहे, असेही त्यांनी सांगितले. या महाकुंभाचे २६ जानेवारी ते १९ फेब्रुवारीदरम्यान आयोजन करण्यात आले आहे.
आणखी वाचा-केईएम, शीव, नायर व कूपरमध्ये महिनाभरात अत्याधुनिक एमआरआय यंत्रणा
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ जगाचे लक्ष वेधून घेईल. छत्रपतींच्या काळातील साहसी खेळांना पुनर्जीवित करण्यासाठी या महाकुंभाचे आयोजन करण्यात आले आहे. लवकरच अशा स्पर्धा राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात भरविण्यात येणार आहेत, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली. आपल्या खेळाडूंमध्ये क्षमता आहे. मात्र त्यांना योग्य वयात, योग्य व्यासपीठ आणि संधी उपलब्ध होत नाही. मात्र आता यापुढे अशा स्पर्धांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील खेळाडूंना अधिक प्रोत्साहन दिले जाईल, असेही शिंदे यांनी सांगितले.