मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) भूखंडावर जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने उभ्या राहिलेल्या प्रकल्पात तीन खोल्या एकत्र करून सुरू असलेल्या मदरशातील अतिक्रमणाला म्हाडाने नोटीस बजावली असता त्या विरोधात संबंधित संस्थेने वक्फ प्राधिकरणाकडे धाव घेतली असता प्राधिकरणाने अंतरिम स्थगिती दिल्यामुळे म्हाडाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. या प्रकरणी आता कायदेशीर सल्ला घेऊन पुढील कार्यवाही करण्याचे म्हाडाने ठरविले आहे.

कांदिवली पश्चिम चारकोप येथे आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या गरजूंसाठी म्हाडाने जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने गृहप्रकल्प राबविला. सेक्टर एकमध्ये नशेमन सहकारी गृहनिर्माण संस्थेला ११९७ चौरस मीटर इतका भूखंड उपलब्ध करुन देण्यात आला. त्यावर ३५ सदनिका बांधण्यात आल्या. यापैकी १४, १५ व १६ क्रमांकाच्या तीन खोल्या एकत्र करुन मदरशाचे काम सुरू असल्याची तक्रार म्हाडाकडे आली. म्हाडाच्या अतिक्रमण विभागाने प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी या स्संस्थेत तीन खोल्या एकत्र करून हॉल बनविण्यात आल्याचे तसेच मदरशा म्हणून वापर होत असल्याचे निदर्शनास आले.याबाबत म्हाडा अधिकाऱ्यांनी विचारणा केली असता परवानगीविना काम सुरू असल्याचे मान्य करण्यात आले.

मुंबई गृहनिर्माण मंडळाच्या अभिलेखानुसार या सदनिका निवासी प्रयोजनासाठी मंजूर करण्यात आल्या होत्या. असे असतानाही तीन निवासी सदनिकांमध्ये विनापरवाना धार्मिक स्थळाचे बांधकाम सुरु असल्याचे निदर्शनास आल्याने म्हाडाने महाराष्ट्र नगररचना कायद्यातील ५२ व ५३(१) अन्वये कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आली.