महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटीच्या वाहतुकीत सध्या आगारांमध्येच अडथळे निर्माण झाले आहे. राज्यातील विविध एसटी आगारांमध्ये सर्रास खासगी गाडय़ा उभ्या राहिल्याने आगारात जाणाऱ्या आणि आगाराबाहेर निघणाऱ्या एसटी गाडय़ा खोळंबून राहण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. रविवारी ठाणे येथील वंदना आगारातही असाच प्रकार घडून त्याचे पर्यवसन एसटीच्या शिवनेरी गाडीच्या कंत्राटी चालकाला मारहाण होण्यात झाले. याचा फटका प्रवाशांनाही काही प्रमाणात बसला. गेल्या काही दिवसांमध्ये या प्रकारांमध्ये वाढ होऊनही एसटी प्रशासन या खासगी वाहनांना आगारांत मज्जाव करण्यासाठी कोणतीही उपाययोजना करताना दिसत नाही.
एसटीच्या आगारांमध्ये खासगी गाडय़ा उभ्या करण्यास नियमाप्रमाणे मज्जाव आहे. या आगारातील जागा एसटी बसगाडय़ा उभ्या करण्यासाठीच वापरली जावी, असा एसटीचा नियम आहे. त्यामुळे एसटी बसच्या वाहतुकीत अडथळा येत नाही. मात्र सध्या या नियमाची पायामल्ली होत असल्याची दृश्ये सर्रास कोणत्याही आगारात दिसत आहेत. मुंबई सेंट्रल, खोपट (ठाणे), परळ, अशा ठरावीक आगारांमध्ये या खासगी गाडय़ांना अडवण्यासाठी एसटीनेच व्यवस्था केली आहे. मात्र इतर आगारांमध्ये अशी कोणतीही व्यवस्था नसल्याने खासगी गाडय़ा, दुचाकी सर्रास आगारांत शिरतात. यात ठाणे (वंदना आणि रेल्वे स्थानक), पुणे (स्वारगेट आणि पुणे स्थानक), पनवेल, कल्याण अशा अनेक आगारांचा समावेश आहे. अनेकदा या गाडय़ा प्रवेशद्वाराच्या बाजूलाच उभ्या केल्या असतात. त्यामुळे एसटी बसगाडय़ा आत येण्यास किंवा बाहेर जाण्यास समस्या उद्भवतात. परिणामी अनेकदा गाडय़ा आगाराबाहेर येण्यासवा आगारात शिरण्यास दहा-दहा मिनिटे ताटकळण्याच्या घटनाही घडल्या .
ठाण्यात गोंधळ
रविवारी सकाळी ठाणे येथील वंदना चित्रपटगृहासमोरील बस स्थानकात याच कारणामुळे गोंधळ झाला. बोरिवलीहून येणाऱ्या ‘शिवनेरी’ बसने एका खासगी वाहनाला ओव्हरटेक केल्याचा राग मनात धरत या खासगी वाहन चालकाने आपली गाडी वंदना स्थानकात घुसवून शिवनेरीसमोर उभी केली. त्यानंतर दोन्ही चालकांमध्ये बाचाबाची झाली व खासगी वाहन चालकाने शिवनेरीच्या चालकाला मारहाण केली. दरम्यान, पोलिसांनी परिस्थितीचा ताबा घेत नियंत्रण मिळवले व दोन्ही चालकांना पोलीस ठाण्यात नेले. या गोंधळामुळे १० वाजता पुण्याला रवाना होणारी शिवनेरी रद्द करण्यात आली. या गाडीतील प्रवाशांना सकाळी १०.३० वाजता सुटणाऱ्या शिवनेरीत जागा देण्यात आल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा