क्रिकेटविश्वातील ध्रुवतारा अशी बिरुदावली सार्थ ठरवणारा.. आपल्या बॅटच्या जोरावर गोलंदाजांबरोबरच टीकाकारांची तोंडे बंद करणारा.. अवीट, सुरेल, सुरेख आणि नजाकतभऱ्या फटक्यांनी अनेकांना भुरळ पाडत स्वर्गीय सुख देणारा.. अनेक मैलाचे दगड पादाक्रांत करत विश्वविक्रमांचे यशोशिखर गाठणारा.. क्रिकेटविश्वामधील प्रत्येकाच्या गळ्यातील ताईत असणारा आणि भारतीयांच्या देव्हाऱ्यात जागा मिळवणाऱ्या या क्रिकेटच्या मैदानातील एका युगाच्या निवृत्तीच्या निर्णयाने सारे क्रिकेटविश्व हळहळले. फक्त क्रिकेटसाठीच जन्म झाला असावा, असे एकामेवाद्वितीय मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे वर्णन करता येईल. आज त्याच सर्वाच्या लाडक्या सचिनने अखेर क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम करण्याचा निर्णय घेतला. पुढच्या महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध सचिनचा दोनशेवा कसोटी सामना होणार असून, या सामन्यानंतर सचिन २४ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीला अलविदा करणार आहे. आपल्या अविस्मरणीय, अप्रतिम, अत्युच्च खेळीने नेहमीच त्याने क्रिकेटविश्वाला आनंद देणारी, दुखण्यावर फुंकर घालणारी आणि जगण्याची नवी उमेद देणारी ही कहाणी आज सुफळ संपूर्ण झाली.
माझे संपूर्ण आयुष्य मी भारताकडून क्रिकेट खेळण्याचे स्वप्न जोपासले. हे स्वप्न मी गेली २४ वष्रे प्रत्येक दिवस जगत आहे. मी ११ वर्षांचा होतो, तेव्हापासून माझ्या क्रिकेट प्रवासाला सुरुवात झाली. त्यामुळे क्रिकेटशिवाय जीवन जगणे ही कल्पनाच करवत नाही. देशाचे प्रतिनिधित्व करणे आणि जगभरात खेळणे, हा मी माझा मोठा सन्मान समजतो. मी माझ्या कारकिर्दीतील २००वा कसोटी सामना मायदेशात खेळून कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करण्याचे ठरवले आहे. गेल्या अनेक वर्षांच्या माझ्यावरील सर्वतोपरी प्रेमाबद्दल आणि मला अंत:करणापासून जोवर खेळावेसे वाटेल तोपर्यंत खेळण्याची परवानगी दिल्याबद्दल बीसीसीआयचा मी अत्यंत ऋणी आहे. माझ्या कुटुंबीयांचा त्यांचा संयम आणि समजूतदारपणा याबद्दल आभारी आहे. या सर्वापेक्षा महत्त्वाचे म्हणजे मी माझे चाहते आणि हितचिंतक यांचा अत्यंत आभारी आहे. त्यांच्या शुभेच्छांमुळेच मला मैदानावर जाऊन सर्वोत्तम कामगिरी करण्याचे बळ मिळाले.
– सचिन तेंडुलकर (बीसीसीआयमार्फत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात)