वीज खरेदी- विक्रीच्या ऑनलाइन व्यवहारांसाठी स्थापन झालेल्या ‘एनर्जी एक्स्चेंज’वर मात्र मंदीची छाया असून अवघ्या अडीच ते तीन रुपये दराने वीज उपलब्ध होत आहे. घसघशीत दर देणाऱ्या ग्राहकांअभावी वीजप्रकल्पांबरोबरच वीजबाजारपेठही थंडावत असल्याचे दिसून येत आहे.
देशात वीज टंचाई वाढू लागल्यानंतर तसेच उपलब्ध विजेला अधिक दर मिळण्यास सुरुवात झाल्यानंतर विजेचे ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी ‘एनर्जी एक्स्चेंज’ची स्थापना झाली. पाच वर्षांपूर्वी तब्बल सात ते आठ रुपये प्रतियुनिट या दराने या बाजारपेठेत विजेची खरेदी होत होती. त्या वेळी खरेदी-विक्रीसाठी अवघी ११०० मेगावॉट वीज उपलब्ध होती. दरम्यानच्या काळात विजेच्या बाजारपेठेतील तेजीमुळे अनेक खासगी प्रकल्प उभे राहिले. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या विजेचे प्रमाण ५२०० मेगावॉटपर्यंत वाढले. मात्र प्रत्यक्षात सुमारे तीन हजार मेगावॉट विजेचेच व्यवहार झाल्याची उदाहरणेही पाहायला मिळाली. व्यापारी तत्त्वावर वीजविक्री करण्यासाठी टाकण्यात आलेले खासगी वीजप्रकल्प घसघशीत दर देणाऱ्या ग्राहकांअभावी बंद आहेत.
घरगुती आणि औद्योगिक वीजग्राहकही सतत वाढणाऱ्या वीज बिलांमुळे त्रासून गेले आहेत. पण त्याचवेळी विजेच्या बाजारपेठेतील दरांचा आलेखही गेल्या पाच वर्षांत घसरत चालल्याचे ‘एनर्जी एक्स्चेंज’च्या पश्चिम विभागातील दरांवरून दिसून येत आहे. २००९ मध्ये तब्बल १० रुपये प्रतियुनिट दर गाठणाऱ्या विजेच्या बाजारपेठेत दर या वर्षी पावणेदोन रुपये ते पावणेतीन रुपये प्रतियुनिट या टप्प्यातच फिरत राहिले. जानेवारीनंतर आता थेट डिसेंबरमध्ये तीन रुपयांचा टप्पा ओलांडला गेला. राज्य वीज मंडळांनी आपली गरज भागवण्यासाठी दीर्घकालीन वीजखरेदी करार केले. राज्याच्या मालकीच्या वीजनिर्मिती कंपन्यांचे प्रकल्पही काही प्रमाणात मार्गी लागले. त्यामुळे राज्य वीज मंडळांनी विजेच्या बाजारपेठेतून काढता पाय घेतला. अत्यावश्यक असेल तेव्हा काही प्रमाणात वीज घेतली जाते. म्हणूनच वीज आहे पण ग्राहक आणि चांगला दर नाही, असे चित्र असल्याचे सूत्रांनी सांगितले.

बाजारातील वीजदर (प्रतियुनिट)
* २००८ – सहा रुपये २४ पैसे ते आठ रुपये ४६ पैसे
* २००९ – दोन रुपये ३९ पैसे ते दहा रुपये ५० पैसे.
* २०१० – एक रुपया ९१ पैसे ते सात रुपये ८४ पैसे.
* २०११ – दोन रुपये ७३ पैसे ते चार रुपये ८९ पैसे.
* २०१२ – दोन रुपये १५ पैसे ते चार रुपये १४ पैसे.
* २०१३ – एक रुपया ७ पैसे ते तीन रुपये २३ पैसे.

Story img Loader