महाराष्ट्र सदन तसेच इतर प्रकरणात आरोपांत अडकलेले राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या वांद्रे आणि सांताक्रुझमधील दोन मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाकडून मंगळवारी जप्त करण्यात आल्या. या दोन्ही मालमत्तांचे मिळून बाजार मूल्य अंदाजे ११० कोटींच्या घरात असल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या महिन्यातच भुजबळांच्या खारघरमधील मालमत्तेवर सक्तवसुली संचालनालयाने टाच आणली होती. त्याचवेळी वांद्रे आणि सांताक्रूझमधील मालमत्तांकडेही संचालनालयाने लक्ष केंद्रित केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती.
महाराष्ट्र सदन व इतर प्रकरणांतून मिळालेल्या लाचेच्या रकमेतूनच या मालमत्ता खरेदी केल्याचा दावा करीत या मालमत्ता जप्त करण्याची कारवाई सुरू करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले होते. या मार्गाने मिळालेला कोटय़वधी रुपयांचा निधी भुजबळ कुटुंबीयांनी त्यांनी स्थापन केलेल्या विविध कंपन्यांमध्ये वर्ग केला. या कंपन्यांमार्फतच त्यांनी विविध मालमत्ता खरेदी केल्याचा निष्कर्ष महासंचालनालयाने काढला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मंगळवारी वांद्रे आणि सांताक्रुझमधील मालमत्ता जप्त करण्याची कारवाई झाली आहे.

Story img Loader