महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छगन भुजबळ विश्वस्त असलेल्या वांद्र्यातील मुंबई एज्युकेशनल ट्रस्टच्या कार्यालयांवर बुधवारी छापा टाकला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारीच मुंबई, पुणे, नाशिक, मनमाड, येवला येथील छगन भुजबळांच्या घरांवर आणि कार्यालयांवर छापे टाकले होते. त्यानंतर लगेचच दुसऱया दिवशी मुंबई एज्युकेशनल ट्रस्टच्या कार्यालयावर छापा टाकण्यात आला. या छाप्यामध्ये पुराव्या दृष्टीने उपयुक्त कागदपत्रे किंवा आक्षेपार्ह वस्तू मिळाल्या नसल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
अंमलबजावणी संचालनालयाकडूनही गुन्हा
दरम्यान, महाराष्ट्र सदनप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छगन भुजबळांविरोधात दोन ‘इन्फोर्समेंट केस इन्फॉर्मेशन रिपोर्ट’ (ईसीआयआर) दाखल केले आहेत. गुन्हेगारी दंडविधानसंहितेनुसार पोलीसांकडून दाखल करण्यात येणाऱया एफआयआर इतकेच महत्त्व ईसीआयआरला आहे. अंमलबजावणी संचालनालयाकडून दाखल झालेला गुन्हा असेच याला म्हटले जाते. यामुळे भुजबळ यांच्यापुढील अडचणीत आणखी भर पडणार आहे.
नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकामातील गैरव्यवहारांप्रकरणी चौकशीसाठी मुंबई उच्च न्यायालयाने विशेष तपास पथक नेमले आहे. अंमलबजावणी संचालनालयही या विशेष तपास पथकाचा भाग आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भुजबळांविरोधात दाखल केलेल्या गुन्ह्याची प्रत अंमलबजावणी संचालनालयाने मागवून घेतली होती. यानंतर त्यांच्याकडे असलेल्या पुराव्यांच्या आधारे भुजबळांविरोधात ईसीआयआर दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. पैशांची अफरातफर आणि परकीय चलन व्यवस्थापन कायदा (फेमा) मधील तरतुदींनुसार भुजबळांविरोधात ईसीआयआर दाखल करण्यात आला आहे.
भुजबळांच्या मुंबई एज्युकेशनल ट्रस्टवरही ‘एसीबी’चा छापा
या छाप्यामध्ये पुराव्या दृष्टीने उपयुक्त कागदपत्रे किंवा आक्षेपार्ह वस्तू मिळाल्या नसल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

First published on: 17-06-2015 at 01:12 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Enforcement directorate files case against chhagan bhujbal