मुंबई : सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) कारवाईचा धाक दाखवत बांधकाम व्यावसायिकाकडून १६४ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हे शाखेने नुकतीच सहा जणांना अटक केली होती. याप्रकरणी आता ईडी प्राथमिक तपास करत असून लवकरच याप्रकरणी ईडी गुन्हा दाखल करण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.
‘ओमकार रियल्टर्स अॅण्ड डेव्हलपर्स’चे मालक ताराचंद मूलचंद वर्मा यांच्याकडून १६४ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष ९ ने सहा जणांना अटक केली. अविनाश शशिकांत दुबे , राजेंद्र भीमराव शिरसाठ, राकेश आनंदकुमार केडिया , कल्पेश बाजीराव भोसले, अमेय सावेकर व हिरेश ऊर्फ रोमी भगत अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
हेही वाचा >>> मुंबईतली रस्त्यांची कामे रेंगाळणार? कंत्राटं रद्द केल्यानंतर प्रशासनाने पुन्हा निविदा मागवल्या
काही दिवसांपूर्वी ताराचंद वर्मा यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात सर्व आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यानुसार ६ जानेवारीला एका आरोपीने त्यांना दूरध्वनी केला होता. त्यानंतर १० जानेवारीला वांद्रे येथील एका कॉफी शॉपमध्ये बैठक झाली. त्याचवेळी, एका आरोपीने ताराचंद वर्मा यांना ईडीचा अधिकारी असल्याचा खोटा दावा केला. तसेच दुसऱ्या बांधकाम व्यावसायिकासोबत झालेल्या व्यवहाराबाबत १६४ कोटी रुपयांच्या तडजोड करण्याची धमकी दिली. ताराचंद वर्मा यांना खंडणीची रक्कम द्यायची नसल्याने या प्रकरणी तक्रार केली. त्यानुसार वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून याप्रकरणाचा तपास गुन्हे शाखेला वर्ग करण्यात आला. ताराचंद वर्मा यांनी तक्रार दाखल केल्यानंतर बैठक झालेल्या कॉफी शॉपमधील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले. यामध्ये ताराचंद वर्मा यांना धमकावत असलेल्या आरोपींची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर या सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटवत रविवारी चौघांना तर सोमवारी एकाला गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. तर सहाव्या आरोपीला नुकतीच गुन्हे शाखेने मंगळवारी अटक केली. याप्रकरणी आता ईडीही प्राथमिक चौकशी करत असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात केल्याचे सूत्रांनी सांगितले.