मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सिद्धार्थ अभय चोक्सी आणि अभय सज्जनलाल चोक्सी यांच्या विरोधात विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. काळ्या पैशांच्या संशयावरून प्राप्तीकर विभागातील सुरू केलेल्या चौकशीच्या आधारे ईडी याप्रकरणी तपास करत आहे. १९ मार्चला या आरोपपत्राची न्यायालयाने दखल घेतल्याचे शनिवारी ईडीने सांगितले.

प्राप्तीकर विभाग काळा पैसा (अघोषित परदेशी उत्पन्न आणि मालमत्ता) आणि कर अधिनियम, २०१५ अंतर्गत सिद्धार्थ आणि अभय चोक्सी यांच्या विरोधात चौकशी करत होते. त्याआधारावर ईडी याप्रकरणी तपास करत आहे. ईडीच्या तपासादरम्यान सिद्धार्थ आणि अभय चोक्सी हे ब्रिटिश व्हर्जिन आयलंडमध्ये नोंदणी करण्यात आलेल्या “ब्लू मिस्ट इंटरनॅशनल .” या कंपनीचे लाभार्थी मालक असल्याचे निष्पन्न झाले आहे. या कंपनीचे सिंगापूरमधील एका बँक खात्यावर नियंत्रण होते, असे उघड झाले आहे. तसेच ब्लू मिस्ट इंटरनॅशनल या कंपनीनेद्वारे सिंगापूरमधील एक मालमत्ता खरेदी करण्यासाठी करार केल्याचेही निष्पन्न झाले आहे. तपासादरम्यान, सिद्धार्थ आणि अभय चोक्सी यांनी एकूण आठ कोटी ९ लाख रुपयांच्या अघोषित परदेशी उत्पन्न आणि मालमत्तेचा गैरव्यवहार केल्याचे आढळून आले. ते या गुन्ह्यांतील उत्पन्न असल्याचे ईडीकडून सांगण्यात आले. यापूर्वी ईडीने या प्रकरणात १ जानेवारी २०२५ ला आठ कोटी ९ लाख रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली होती.