मुंबई : मेसर्स महादेव ऑनलाइन बुक बेटिंग अॅप प्रकरणात प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूरला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले. त्याला ६ ऑक्टोबर रोजी ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. या प्रकरणात एक साक्षीदार म्हणून त्याचा जबाब नोंदवण्यात येणार आहे.
रणबीरने समाजमाध्यमांवर या अॅपसाठी जाहिरात केल्याची माहिती ईडीच्या तपासात उघड झाली आहे. त्याच्यासह १२ हून अधिक कलाकार, खेळाडूंनी महादेव अॅपसाठी समाजमाध्यमांवर जाहिरात केल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यांचेही लवकरच जबाब नोंदवण्यात येणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जाहिरातीसाठी सर्वाधिक रक्कम रणबीरला मिळाल्याचा ईडीला संशय आहे.
हेही वाचा >>>पालकमंत्री दीपक केसरकर यांना अद्याप दालनाची प्रतीक्षाच; कामकाज मात्र सुरू
विवाह सोहळय़ात कोटय़वधी रुपये खर्च..
ईडीने सप्टेंबर महिन्यात मेसर्स महादेव ऑनलाइन बुक बेटिंग अॅप संबंधित प्रकरणात कोलकाता, भोपाळ आणि मुंबई येथील ३९ ठिकाणी छापे टाकले होते. याप्रकरणी सुमारे ४१७ कोटी रुपये किमतीची मालमत्ता गोठवण्यात अथवा जप्त करण्यात आली होती. बुक बेटिंग अॅपच्या प्रवर्तक सौरभ चंद्राकर व भागीदार रवी उप्पल दोघेही या अॅपचे प्रवर्तक आहेत. फेब्रुवारी २०२३ मध्ये सौरभ चंद्राकरचा दुबईमध्ये विवाह झाला. या सोहळय़ासाठी सुमारे २००कोटी रुपये रोख खर्च केले. कुटुंबातील सदस्यांना नागपूरहून दुबईला नेण्यासाठी खासगी विमान भाडय़ाने घेण्यात आले होते. लग्नात सादरीकरण करण्यासाठी हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार व गायकांना आमंत्रित करण्यात आले होते.