मुंबई : मध्य रेल्वेच्या माझगाव यार्डजवळ इंजिनचे एक चाक रुळावरून घसरले. ही घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेमुळे लोकल सेवेचे तीनतेरा वाजले. तसेच भायखळा-सीएसएमटी अप जलद मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली. परिणामी, गुरुवारी सकाळपासून मध्य रेल्वेवरील लोकल सेवा विलंबाने धावत आहे.
माझगाव यार्डातील शंटिंग इंजिनचे चाक गुरुवारी दुपारी १२.४३ वाजता रेल्वे रुळावरून घसरले. यामुळे जलद मार्गावरील लोकल सेवेचा खोळंबा झाला. बराच वेळ प्रवासी लोकलमध्येच अडकून पडले. तसेच हैदराबाद-सीएसएमटी एक्स्प्रेस माझगावजवळ, निजामुद्दीन- सीएसएमटी राजधानी एक्स्प्रेस परळजवळ येथे थांबवण्यात आली. त्यानंतर या रेल्वेगाड्या कूर्मगतीने पुढे नेण्यात आल्या. राजधानी एक्सप्रेसला परळ – भायखळ्यादरम्यान प्रवासासाठी १५ मिनिटे लागली. भायखळा येथे बराच कालावधी थांबल्यानंतर दुपारी १.३५ च्या सुमारास ती पुढे मार्गस्थ झाली. तसेच कल्याण – सीएसएमटी अप जलद १५ डब्यांची लोकल भायखळा फलाट क्रमांक ४ वर थांबवण्यात आली होती.
हेही वाचा – नवीन करोना उपप्रकाराचे डॉक्टरांपुढे आव्हान!
लोकल का थांबल्या आहेत याची माहिती रेल्वे प्रशासनाने द्यायला हवी होती. तसेच याबाबत लोकलमध्ये उद्घोषणा करण्याची गरज होती. पण रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना कोणतीच माहिती न दिल्यामुळे संभ्रमाचे वातावरण होते. – मेहमुद्दीन शेख, प्रवासी