पालिकेचे कनिष्ठ अभियंता राजेश राठोड यांना मारहाण करणारे मनसेचे स्वीकृत नगरसेवक गिरीश धानुरकर यांच्यासह संतोष शिवतरकर, अमित पाटील आणि उल्हास सांवत या चौघांना दादर पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली.
अनधिकृत शेड काढण्याची तोंडी तक्रार देऊन कारवाई केली नाही याचा राग येऊन धानुरकर यांनी राठोड यांना गुरुवारी दादरमधील मनसेच्या शाखेत बोलावून पालिकेचे बेदम मारहाण केली होती. यानंतर पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांना तात्काळ पत्र पाठवून कठोर कारवाई करण्याची मागणी केली. धानुरकर ज्या दादरमधील १८५ क्रमांकाच्या शाखेत बसतात तेथेच त्यांनी अनधिकृत पोटमाळा उभारला असून आजपर्यंत पालिकेने त्यावर कारवाई केलेली नाही.
दादरमधील कबुतरखाना येथे एका जागामालकाने अनधिकृत शेड बांधल्याची तक्रार दूरध्वनीवरून करून त्यावर कारवाई करण्यासाठी धानुकर अभियंता राठोड यांच्यावर दबाव आणत होते. आपण लेखी तक्रार दाखल करा, मी तात्काळ कारवाई करतो, असे राठोड यांनी सांगितले. त्यानंतर धानुरकर यांनी केलेला दूरध्वनी राठोड यांनी घेतला नाही. राठोड यांना मनसेच्या शाखेत बोलावून शाखेचे शटर बंद करून धानुरकर व मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली.
याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात धानुरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी शाखेला टाळे ठोकले आहे. यापूर्वी मनसेचे आमदार राम कदम यांच्या कार्यकर्त्यांनी घाटकोपर येथे अनधिकृत बांधकाम तोडू नये म्हणून पालिकेच्या अभियंत्याला बेदम मारले होते. आता केवळ तोंडी तक्रार करून धानुरकर यांनी अभियंत्याला मारहाण केल्यामुळे पालिकेच्या अभियंत्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून धानुरकर यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी अभियंता संघटनेने केली आहे. यापूर्वी धानुरकर यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्यांना तडीपारही करण्यात आले होते. शाखाध्यक्ष असताना दोन वर्षांपूर्वी १८५ क्रमांकाच्या शाखेत त्यांनी अनधिकृत पोटमाळा बांधला होता. याबाबतच्या अनेक तक्रारी पालिकेच्या विभाग कार्यालयात करण्यात आल्या आहेत. या जागेचे मालक कवळी यांनीही लेखी तक्रार केली आहे. तसेच माहितीच्या अधिकाराखाली अर्जही केला असून आजपर्यंत जी-उत्तर विभागाच्या सहाय्यक पालिका आयुक्तांनी शाखेचे अनधिकृत बांधकाम पाडलेले नाही.
विधानसभेत एका पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण झाल्यानंतर पोलीस महानिरीक्षक संजीव दयाळ यांच्यापासून अख्खे पोलीसदल एकत्र आले. आता पालिका अभियंत्याला मारहाण झाल्यानंतर पोलीस किती कठोर कारवाई करतात याकडे आमचे लक्ष असल्याचे पालिका अभियंत्यांचे म्हणणे आहे.