रस्ते घोटाळ्याच्या तपासात ‘एसआयटी’चे कसब पणाला
मुंबई महापालिकेत झालेल्या ३५२ कोटी रुपयांच्या रस्ते घोटाळ्याच्या तपासासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाचे (एसआयटी) कसब पणाला लागले आहे. एकीकडे ज्या कंपन्यांवर गुन्हा दाखल झाला आहे, त्यांचे अनेक अभियंते फरार झाले आहेत. अनेक जण पोलिसांना टाळण्यासाठी लपतछपत ‘भारतदर्शन’ करत आहेत. त्यामुळे अभियंत्यांना शोधून काढण्याकरिता अधिकाऱ्यांना दिवसरात्र अभियंत्यांच्या घरावर लक्ष ठेवावे लागत आहे. त्यातच या अभियंत्यांच्या बाजूने तज्ज्ञ वकिलांची मोठी फौजच्या फौज आहे. त्यांच्या कायदेशीर कार्यवाहीला तोंड देण्यासाठी चौकशी प्रकरणाची चोख मांडणीही करावी लागते आहे.
शहरातील १४ तर उपनगरातील २० रस्त्यांच्या बांधणी संदर्भातील हा घोटाळा आहे. घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त (कुलाबा विभाग) राजन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षकांचे विशेष तपास पथक (एसआयटी) तयार केले आहे. पोलिसांनी सहा बडय़ा कंत्राटदारांविरोधात गुन्हा दाखल करताच या कंत्राटदारांकडे अभियंते म्हणून काम करणारे सर्वजण फरार झाले आहेत. यापैकी अनेक अभियंत्यांना रात्री घरी चोरपावलांनी प्रवेश करताना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अभियंत्यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या घरावर नजर ठेवावी लागत आहे. घोटाळ्यात अटक झालेले अभियंते हे काही सराईत गुन्हेगार नाहीत. त्यातील बहुतेक तर वर्ष-दोन वर्षांपूर्वी कामाला लागलेले असून अल्पावधीतच घोटाळ्याच्या सर्व प्रक्रियांना सरावल्याचे दिसून आले आहे, असे एसआयटीमधील एका अधिकाऱ्याने सांगितले. अटक होणार हे माहित असल्याने हे अभियंते दिवसा घरी येण्याचे टाळत आहेत. तसेच, काहीजणांनी आपल्या मित्र, नातेवाईकांकडे आसरा घेतला आहे. विशीत असलेल्या या अभियंत्यांपैकी काहींनी तर आपली अटक टाळण्यासाठी भारतदर्शनचा मार्गही पत्करला होता. देशात लपतछपत राहिलो तर पोलिसांच्या तावडीत सापडणार नाही, अशा समजुतीतही काही अभियंते होते.
अभियंत्यांच्या वकिलांच्या फौजा
अटक करण्यात आलेल्या अभियंत्यांनी आपल्या बचावासाठी वकिलांच्या फौजा उभ्या केल्या आहेत. एका अभियंत्याने तर चार वकिलांच्या साथीने आपला बचाव करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. हे वकील कायद्याचा कीस पाडत असून त्यांना शह देण्यासाठी आरोपींना अटक केल्यापासून त्यांच्याबाबतीत कायदेशीर कार्यवाहीत कुठलीही त्रूटी राहू न देण्याच्या सूचना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या आहेत.