मुंबई: मालाड (पश्चिम) येथील दादीसेठ मार्ग येथे रस्त्याच्या कामादरम्यान मलनि:सारण प्रचालन कामासाठी चेंबरचे खोदकाम केल्यानंतर तेथे सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष करुन ते धोकादायक पद्धतीने खुले ठेवल्याप्रकरणी संबंधित अभियंत्यास नोटीस बजावण्यात येणार आहे. या अभियंत्याला नोटीस बजाविण्याचे व सक्त कारवाई करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.
मुंबईत विविध ठिकाणी रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर हे गेल्या काही दिवसांपासून विविध ठिकाणी कार्यस्थळी जाऊन कामांची पाहणी करत आहेत. या अंतर्गत मालाड पश्चिम काचपाडा येथील रामचंद्र मार्ग, कांदिवली पश्चिम येथील पारेख गल्ली, महावीर नगर मार्ग काँक्रिटीकरण कामाची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी गुरुवारी रात्री प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. या दौऱ्यादरम्यान बांगर यांनी मालाड पश्चिम येथील दादीसेठ मार्ग, मालाड शॉपिंग सेंटर जवळील मार्ग आणि बालाजी हॉटेल समोरील काँक्रिटीकरण कामांची देखील आकस्मिक पाहणी केली. यावेळी त्यांना चेंबर खुले असल्याचे आढळून आले तेव्हा त्यांनी वरील निर्देश दिले.
मालाड पश्चिम येथील दादीसेठ मार्गावर काँक्रिटीकरण कामाबरोबरच मलनि:सारण प्रचालन विभागाचे कामकाज सुरू आहे. या ठिकाणी हमरस्त्यावर खोदकाम करत केवळ एकाच बाजूने बॅरिकेड्स लावण्यात आले होते. तर उर्वरित बाजूने चेंबर धोकादायक पद्धतीने खुले असल्याची बाब बांगर यांच्या निदर्शनास आली. या प्रकरणाची दखल घेत संबंधित अभियंत्यास नोटीस बजाविण्याचे व सक्त कारवाई करण्याचे निर्देश बांगर यांनी दिले. बांगर यांच्या आदेशानुसार चेंबरला तातडीने चहुबाजूने बॅरिकेड्स लावण्यात आले. रस्तेकामादरम्यान, वाहतुकीचे योग्य नियमन करण्यासाठी सुयोग्यपणे रस्तारोधक (बॅरिकेड्स) लावण्याची जबाबदारी कंत्राटदारांची असली तरी त्यावर रस्ते विभागाच्या अभियंत्यांचे नियंत्रण हवे, असेदेखील बांगर यांनी नमूद केले.
दुचाकींसाठी वाहतूक योग्य रस्ता हवा……
मालाड शॉपिंग सेंटर जवळील मार्ग आणि बालाजी हॉटेल समोरील काँक्रिटीकरण कामांची आकस्मिक पाहणी करताना बांगर यांनी महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदविली. एका बाजूचे काँक्रिटीकरण काम करताना दुस-या बाजूच्या रस्त्याची पातळी समतल असावी, जेणेकरून वाहतूक सुरळीत राहील. विशेषत: दुचाकींसाठी वाहतुकयोग्य रस्ता असावा, याची दक्षता बाळगावी. उपयोगिता वाहिन्यांचे स्थलांतरण करताना खबरदारी घ्यावी, असे निर्देश बांगर यांनी दिले. काँक्रिट रस्ते प्रकल्पाची अंमलबजावणी करताना अभियंत्यांनी प्रत्यक्ष कार्यस्थळी (ऑन फिल्ड) उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
मालाडमधील रस्ते कामाच्या ठिकाणी क्यू आर कोड …
मालाड पश्चिम काचपाडा येथील रामचंद्र मार्ग, कांदिवली पश्चिम येथील पारेख गल्ली, महावीर नगर मार्ग काँक्रिटीकरण कार्यस्थळी नागरिकांसाठी माहिती फलक प्रदर्शित करण्यात आले आहेत. त्यावर काम सुरु केल्याचा दिनांक, काम संपुष्टात येण्याचा दिनांक, कामाचा कालावधी, रस्त्याची लांबी, रुंदी, कामाचे ठिकाण इत्यादी माहिती देण्यात आली आहे. त्याच बरोबर ‘क्यू आर कोड’ स्कॅन करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.