व्यवसायातून निर्माण झालेल्या वादातून मित्राला धडा शिकविण्यासाठी चक्क विमानात बॉम्ब ठेवल्याचा बनाव रचणाऱ्या संगणक अभियंत्याने बनावट कागदपत्रे सादर करून लीलया सिमकार्ड घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईत हजारो सिमकार्डे बनावट असल्याबाबत पोलिसांकडून चौकशी सुरू असतानाही या अभियंत्यांला लगेच बनावट सिमकार्ड मिळू शकल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.
गुन्हे अन्वेषण विभागाच्या अंधेरी युनिटचे वरिष्ठ निरीक्षक दीपक फटांगरे यांच्या पथकाने या प्रकरणाची उकल करताना संदीप मेनन (४४) या उच्चविद्याविभूषित अभियंत्याला अटक केली होती. विलेपार्ले येथे राहणाऱ्या मेननला ओमान विद्यापीठातील माहिती तंत्रज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना ई लर्निंगद्वारे अभ्यासक्रम शिकविण्यासाठी ४६ लाखांचे कंत्राट मिळाले होते. त्यासाठी आवश्यक तो संगणक प्रोग्राम तयार करण्यासाठी दिल्लीतील तज्ज्ञ अंबरीश परिख याला मुंबईत बोलावले होते. त्यासाठी मोठी रक्कम देण्याचे आश्वासनही दिले होते. अंबरीश याने काम सुरू केल्यानंतरही  मेनन पैसे देण्यास टाळाटाळ करत होता.
आपली फसवणूक करीत असल्याचे लक्षात आल्यानंतर अंबरीश काम अर्धवट सोडून पुन्हा दिल्लीला जाण्यासाठी निघाला. त्यावेळी गो एअरवेजच्या ज्या विमानाने दिल्लीला जाणार होता, त्या विमानात बॉम्ब असल्याचा व संबंधित प्रवाशाची माहिती त्याने पोलिसांना दिली. यासाठी त्याने बनावट सिमकार्ड वापरले. या क्रमांकाचा पत्ता बनावट होता. परंतु तांत्रिक कौशल्याचा वापर करून हा क्रमांक मेननकडे असल्याची माहिती फटांगरे यांच्या पथकाने मिळविली. त्यानुसार त्याला अटक करण्यात आली होती. या व्यतिरिक्त या अभियंत्याचा अन्य कुठल्याही घातपाताशी संबंध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र या प्रकारामुळे अनेक प्रवाशांची महत्त्वाची कामे खोळंबली.    

Story img Loader