घोटाळेबाज अभियांत्रिकी महाविद्यालयांवरील कारवाई प्रकरण
महाराष्ट्रातील बहुतेक महाविद्यालयांत अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या निकषांचे पालन होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबई विद्यापीठानेही स्थानीय चौकशी समिती (एलआयसी)नेमून अहवाल तयार करण्याचे काम हाती घेतले असून, गंभीर त्रुटी असलेल्या महाविद्यालयांवर कारवाईची शिफारस करून अंतिम निर्णयासाठी हे अहवाल येत्या २५ मे रोजी उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे पाठविण्यात येणार आहेत. त्यामुळे घोटाळेबाज अभियांत्रिकी महाविद्यालयांवर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री आता काय कारवाई करणार याकडे शिक्षण क्षेत्रातील जाणाकारांचे लक्ष आहे.
मुंबई विद्यापीठाच्या अखत्यारीतील अनेक अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये गंभीर स्वरूपाच्या त्रुटी असून, एआयसीटीईने २००२ साली २००८पर्यंत या त्रुटी दूर करण्याचे आदेश देऊनही यातील बहुतेक महाविद्यालयांनी त्रुटी तर दूर केल्या नाहीतच उलट एकाच जागी ते नियम धाब्यावर बसून वेगवेगळे अभ्यासक्रम चालविले.
या साऱ्याची गंभीर दखल घेत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी ‘एलआयसी’ समित्या नेमताना ज्या महाविद्यालयांबाबत गंभीर तक्रारी आहेत, तेथील प्राचार्य व अध्यापकांना या समित्यांपासून दूर ठेवले. परिणामी ६४ अभियांत्रिकी महाविद्यालयांबाबत यंदा प्रथमच वस्तुस्थितिनिष्ठ अहवाल शासनाकडे कारवाईसाठी पाठविले जाणार असल्याचे विद्यापीठातील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.
यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यापीठाने नियमितपणे तपासणी न केल्यामुळे गेल्या तीन वर्षांत जवळपास २२५ महाविद्यालयांमध्ये एलआयसी समिती पाठविण्याची जबाबदारी विद्यमान कुलगुरू डॉ. देशमुख यांच्यावर आली. त्यातच अभियांत्रिकी महाविद्यालयांचा प्रश्न नाजूक असल्यामुळे १५ मेपर्यंत एलआयसीचा अहवाल तयार होऊ शकणार नाही तर २५ मेपर्यंत हा अहवाल विद्यापीठाच्या कारवाईच्या शिफारशीसह उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाकडे कारवाईसाठी पाठविण्यात येईल. त्यानंतर शासनाकडून जे आदेश मिळतील त्याप्रमाणे विद्यापीठ कारवाई करेल असेही उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले.

संलग्नता रद्द करणार?
विद्यापीठाची फसवणूक करणाऱ्या प्राचार्य तसेच यापूर्वीच्या एलआयसी समितीतील पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या चुकीच्या अहवालासंदर्भात कुलगुरू डॉ. देशमुख कोणती भूमिका घेणार तसेच खात्याचे मंत्री विनोद तावडे विद्यापीठाच्या अहवालानुसार संबंधित दोषी अभियांत्रिकी महाविद्यालयांची सलग्नता रद्द करण्याचा निर्णय घेण्याची हिम्मत दाखवणार का, असा सवाल विद्यापीठातील ज्येष्ठ अध्यापकांनी केला.

Story img Loader