मुंबई : इंग्रजी ही जागतिक भाषा आहे, हा आपला भ्रम आहे. इंग्रजीपेक्षा मराठी भाषा समृद्ध आहे. महाराष्ट्रात मराठी भाषा टिकवायची असेल, तर एकाही इंग्रजी माध्यमाच्या शाळेला परवानगी देऊ नये, असे तत्त्व व धोरण राबविणे गरजेचे असल्याचे परखड मत ज्येष्ठ लेखक भालचंद्र नेमाडे यांनी मांडले.
सेंटर फॉर पॉलिसी अँड गव्हर्नन्स पुणे आणि यशवंत चव्हाण सेंटर यांच्यातर्फे शनिवारी सायंकाळी दत्ता घोलप आणि संग्राम गायकवाड लिखित ‘मराठी भाषा : धोरण आणि अमलबजावणी’ या पुस्तकाचे प्रकाशन लेखक भालचंद्र नेमाडे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. मराठी भाषा ही जगातील मुख्य भाषा आहे. १९ व्या शतकामध्ये महाराष्ट्रामध्ये लोकमान्य टिळक, रानडे, गोखले, फुले यासारख्या अनेक नामवंत व्यक्ती झाल्या. अशा व्यक्ती जगामध्ये कोठेच सापडणार नाहीत. तरीही आपण मागे आहोत. यामागे मराठी माणसाचा दृष्टिकोन आणि चुकीची वागण्याची पद्धत कारणीभूत आहे. ज्या परप्रांतियांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधून शिकायचे आहे त्यांनी त्यांच्या राज्यात जाऊन शिकावे, तसेच मराठी भाषेला अर्थकारण मिळाले पाहिजे. मराठीतून शिक्षण घेतल्यास नोकरी मिळेल यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी धोरण ठरवणे गरजेचे असल्याचे मत नेमाडे यांनी मांडले.
१४० कोटी भारतीय इंग्रजी भाषा बोलतात म्हणून ती जागतिक भाषा झाली आहे. आपण इंग्रजी बोलणे बंद केले तर ती भाषा लहान होईल. कारण जगामध्ये इंग्लंड आणि अमेरिका वगळता कोठेच ही भाषा बोलली जात नाही. इंग्लंडपासून काही तासांच्या अंतरावर असलेल्या फ्रान्स, जर्मन, स्पेन, इटली या युरोपीय देशांमध्येही इंग्रजी भाषा बोलली जात नाही. आपण गुलाम आहोत म्हणून इंग्रजी भाषा बोलतो. इंग्रजी भाषेपेक्षा मराठी भाषा फारच समृद्ध आहे. मराठीमध्ये संत ज्ञानेश्वरांपासून तुकारामांपर्यंत अनेक संत झाले आहे आहेत. मराठीमध्ये जवळपास १५० पेक्षा जास्त महिला लेखिका आहेत, मराठीमध्ये पहिल्या शतकापासून विविध प्रकारची वाड्मय व ग्रंथसंपदा आहे. याउलट इंग्रजीची अवस्था आहे. यातील एकही गोष्ट इंग्रजी भाषेकडे नाही, असेही नेमाडे म्हणाले.