आसपासच्या शहरांना पाणीपुरवठा करण्यास पालिकेची असमर्थता; मुंबईकरांना ३१ जुलैपर्यंत चिंता नाही, तरीही पाऊस वेळेवर हवाच
गतवर्षीच्या अवर्षण स्थितीमुळे एकीकडे अवघे राज्य होरपळत असताना राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत मात्र पाण्याची ददात नाही. असे असले तरी मुंबईकरांचे पाणी राज्यातील ग्रामीण भागालाच काय, पण आसपासच्या शहरांनाही पुरवणे शक्य नसल्याचे मुंबई महापालिकेने स्पष्ट केले आहे. मुंबईकरांना ३१ जुलैपर्यंत पुरेसे पाणी उपलब्ध आहे. मात्र, दुष्काळाच्या झळांनी तहानलेल्या मुंबईलगतच्या गावांपर्यंत ते पोहोचविण्यासाठी यंत्रणाच नाही आणि रस्ते मार्गाने टँकरमधून तिथपर्यंत पाणी पोहोचविणे व्यवहार्य ठरणार नाही, अशी खंत पालिका आयुक्त अजय मेहता यांनी व्यक्त केली.
मुंबईला मोडकसागर, तानसा, विहार, तुळशी, अप्पर वैतरणा, भातसा आणि मध्य वैतरणा या धरणांमधून पाणीपुरवठा करण्यात येतो. तलावांमधील उपलब्ध साठा लक्षात घेऊन पालिकेने यापूर्वीच मुंबईत २० टक्के पाणीकपात लागू केली आहे. दर दिवशी मुंबईकरांची तहान भागविण्यासाठी ३७५० दशलक्ष लिटर पाणी या धरणांमधून जलवाहिन्यांच्या माध्यमातून मुंबईत आणले जाते. जलशुद्धीकरण केंद्रात शुद्धीकरण झाल्यानंतर ते जलवाहिन्यांमधूनच मुंबईकरांच्या घरी पोहोचते. थेट धरणांपासून मुंबईकरांच्या घरापर्यंत जलवाहिन्यांचे जाळे पसरले आहे. आजघडीला या धरणांमध्ये तब्बल चार लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. या धरणांमधील राखीव कोटय़ासह उपलब्ध पाणी ३१ जुलैपर्यंत मुंबईकरांना पुरेल, असे मेहता यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
मुंबईला मुबलक पाणीपुरवठा होत असला तरी, हे पाणी राज्यातील अन्य भागांना पुरवणे
अशक्य आहे, असे मेहता म्हणाले. सर्व धरणे थेट जलवाहिन्यांनी मुंबईशी जोडली गेली आहेत. धरणांच्या आसपासच्या परिसरातील रहिवासांना पाणी मिळू शकते आणि ते दिलेही जाते. पण दूरवरच्या गावांची तहान भागविण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा आपल्याकडे नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
टँकरच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त गावांमध्ये पाणी पोहोचविता येईल का, असा प्रश्न विचारला असता अजय मेहता म्हणाले की, दुष्काळग्रस्त गावे दूरवर आहेत. तेथपर्यंत रस्ते मार्गाने टँकरमधून पाणी पोहोचविणे व्यवहार्य ठरणार नाही. टँकरमध्ये पाणी भरण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी लागेल. थेट धरणाजवळ तशी व्यवस्था करणे योग्य ठरणार नाही. कारण धरणातील अशुद्ध पाणी शुद्ध करावे लागते. त्यासाठी ते पाणी जलशुद्धीकरण केंद्रात आणावे लागेल आणि शुद्ध पाणी टँकरमध्ये भरण्यासाठी तेथे स्वतंत्र व्यवस्था करावी लागेल. मात्र तशी व्यवस्था करणे पालिकेच्या दृष्टीने अव्यवहार्य ठरू शकेल, असे अजय मेहता यांनी सांगितले.
दुष्काळी महाराष्ट्रात मुंबई मात्र सुजलाम्!
तलावांमधील उपलब्ध साठा लक्षात घेऊन पालिकेने यापूर्वीच मुंबईत २० टक्के पाणीकपात लागू केली आहे.
Written by प्रसाद रावकर
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 08-04-2016 at 05:20 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Enough water for mumbai till july