राज ठाकरे यांची मागणी; रस्त्यांवरील खड्डय़ांवरून ‘राज’कीय लढाई

गेल्या दोन दशकांत एकही खड्डा नसलेला चांगला रस्ता अभियांत्यांनी का बांधला नाही.. आज राजीनामे देण्यासाठी एकत्र आलेले हे अभियंते चांगला रस्ता बांधण्यासाठी याआधी एकत्र का आले नाहीत, असा रोखठोक सवाल करत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील रस्त्यांवरील खड्डय़ांना अभियंतेच जबाबदार असून प्रत्येक विभागातील पोलीस ठाण्यात या अभियंत्यांविरोधात गुन्हे नोंदवा, असे आदेश कार्यकर्त्यांना दिले.

मुंबई उच्च न्यायालयानेही वेळोवेळी रस्त्यावर पडणाऱ्या खड्डय़ांवरून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईतील खड्डे हे मृत्यूचे सापळे बनले असून या खड्डय़ांनी अनेक दुचाकीस्वारांचे आजपर्यंत जीव घेतले आहेत. एखाद्या रुग्णाला रुग्णवाहिकेतून दाखल करायचे असेल तर खड्डय़ांमुळे वेळेत पोहोचता येत नाही. पोहोचलाच तर त्याचा आजार बळावलेला असतो. एकही चांगला रस्ता आजपर्यंत मुंबई महापालिकेतील अभियंत्यांना का बांधता आला नाही, असा सवाल करत,  ४२०० अभियंत्यांचे राजीनामे तात्काळ स्वीकारावे, असे आव्हान राज ठाकरे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना पालिका आयुक्त अजोय मेहता यांना दिले. एक दिवसाच्या नाजीनामा आंदोलनाची नौटंकी यांनी केली असली तरी या अभियंत्यांना आता हाकलून द्या, असले अभियंते आम्हाला नकोत असे सांगून राज म्हणाले, अनेक होतकरू तरुण अभियंते बेरोजगार असून त्यांची नियुक्ती तरी त्यामुळे करता येईल. सहावा, सातवा वेतन आयोग घेणारे हे अभियंते एकत्र येऊन ताकद दाखवतात, हीच ताकद चांगले रस्ते बांधण्यासाठी का दाखवली नाही, असा जळजळीत सवालही राज ठाकरे यांनी केला.

गणपतीपूर्वी खड्डे बुजवले जातील असे यापूर्वी आयुक्तांनी सांगितले होते आता नवरात्रौत्सव संपेल तरी खड्डे पुराण संपलेले नाही. प्रशासन केवळ ३५ खड्डे असल्याचे सांगते हे सारे संतापजनक आहे. मुंबईकरांच्या सहनशक्तीचा अंत पाहणारे आहे. रस्त्यांच्या निविदा हेच अभियंते तयार करतात.  निविदेद्वारे कंत्राटदारही हेच निश्चित करतात. अटी व शर्तीनुसार रस्ते तयार केले जातात अथवा नाही हे पाहाणेही अभियंत्यांचीच जबाबदारी आहे. स्थायी समितीत नगरसेवक केवळ रस्त्याच्या कामांना मंजुरी देतात. नगरसेवक तांत्रिक तज्ज्ञ नाहीत. त्यामुळे रस्त्यांची जबाबदारी ही सर्वस्वी अभियंत्यांचीच आहे, असेही ते म्हणाले.

एकही चांगला रस्ता आजपर्यंत मुंबई महापालिकेतील अभियंत्यांना का बांधता आला नाही? ४२०० अभियंत्यांचे राजीनामे तात्काळ स्वीकारावे.

– राज ठाकरे 

Story img Loader