शहरबात : प्रसाद रावकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

prasadraokar@gmail.com

निर्बधांमुळे दहीकाला उत्सव साजरा करता येणार नाही. मात्र तरीही गोविंदा पथके आणि त्यांची पाठराखण करणाऱ्या राजकारण्यांनी बाह्य़ा सरसावून उत्सव साजरा होणारच अशी भूमिका घेतली आहे. करोना संसर्गाचे समूळ उच्चाटन झालेले नाही. त्यामुळे उत्सवप्रेमींनी सदसद्विवेकबुद्धीने वागावयास हवे. समाजभान राखून संकटसमयी मुंबईकरच नव्हे तर महाराष्ट्रातील विविध भागातील नागरिकांच्या मदतीला धावून जाणाऱ्या गोविंदा पथकांनी आपली जबाबदारी ओळखायला हवीच.

जन्माष्टमी, दहिकाला हा महाराष्ट्रातील गणेशोत्सवाइतकाच लोकप्रिय उत्सव. रांगडय़ा तरुणांचा आवडता उत्सव. पूर्वी अगदी पारंपरिक पद्धतीने हा उत्सव साजरा होत होता. कच्छीबाजा, कोंबडीबाजा, बेंजोच्या तालावर गोविंदा थिरकत गल्लोगल्ली फिरायचे. मानाच्या दहीहंडय़ा फोडायचे आणि सायंकाळी ५ च्या सुमारास थकूनभागून गोविंदा आपापल्या घरी परतायचे. त्याचबरोबर चित्ररथांच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना वाचाही फोडली जायची. मात्र कालौघात या उत्सवाचे रूपच बदलून गेले. पथकांमध्ये उंच आणि लक्षावधी रुपयांच्या बक्षिसांच्या दहीहंडी फोडण्याची चुरस सुरू झाली आणि या उत्सवाला जीवघेणे रूप आले. पारंपरिक वाद्यांच्या तालावर थिरक परिसरात फिरणारे गोविंदा आता लाखमोलाच्या पारितोषिकांच्या दहीहंडय़ा शोधत बस, टेम्पो, ट्रक, दुचाकीवरून मुंबई-ठाण्यात घुमू लागले. एकुणात या उत्सवाचा नूरच बदलून गेला.

मुंबई-ठाण्यातील ठरावीक गोविंदा पथके दोन-तीन महिने सराव करून उंच मानवी थर रचू लागले. उंच दहीहंडीला गवसणी घालणाऱ्या या पथकांच्या पावलावर पाऊल टाकत इतर छोटय़ा-मोठय़ा पथकांनाही सात-आठ थर रचण्याची भुरळ पडू लागली. त्यातून अपघातांचे प्रमाण वाढू लागले. थर कोसळून जायबंदी होणाऱ्या तरुणांची संख्या वाढू लागली. थर रचताना कोसळलेल्या काही तरुणांवर काळाने झडप घातली आणि त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. अशा घटना घडत असतानाच उंच थर रचण्याची चुरस मात्र वाढतच राहिली. त्यामुळे अखेर काही सामाजिक संस्था, समाजसेवकांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आणि अखेर राज्य सरकारने दहीहंडीच्या उंचीवर मार्यादा घातली. यावरून बराच गहजब झाला. त्यातून या उत्सवाला खेळाचा दर्जा मिळाला, पण उत्सवावर काही अटी लादण्यात आल्या. परिणामी, गेल्या काही वर्षांमध्ये उत्सवाला आलेली स्पर्धेची झिंग उतरली. उत्सवाला गतवैभव मिळावे यासाठी आजही गोविंदांचे प्रयत्न सुरू आहेत. पण त्यांना यश मिळेल असे वाटत नाही, असो.

स्पर्धेच्या निमित्ताने दहीकाला उत्सवाची उलाढाल कोटीच्या कोटी उड्डाणे घेऊ लागली. मुंबई-ठाण्यामध्ये लाखमोलाच्या दहीहंडय़ा बांधल्या जाऊ लागल्या. गल्लोगल्ली आयोजक निर्माण झाले. दिवसभर गोविंदा पथकांना झुंजविण्याचा खेळ सुरू झाला. मात्र बक्कळ पारितोषिकाची रक्कम पदरात पडावी यासाठी पथकांमधील गोविंदा उंच थर रचण्याचे प्रयत्न करू लागले. केवळ जीवघेणी स्पर्धाच नव्हे, तर पथकापथकांमध्ये वितुष्टही निर्माण होऊ लागले. एकोप्याचा विसर पडून पथकांमध्ये वाद, हाणामाऱ्याही होऊ लागल्या. उत्सवाच्या बदलत्या रूपामुळे सरकारी, पालिकेच्या रुग्णालयांनाही सज्ज राहावे लागत आहे. तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आणि वाहतुकीचा बोजवारा उडू नये म्हणून पोलीस आणि वाहतूक पोलिसांवरही मोठी जबाबदारी येऊन पडली. दिवसभर भरधाव वेगात धावणाऱ्या दुचाकींवरून फिरणाऱ्या गोविंदांचे बेताल वागणे, ट्रक, टेम्पोमधून मुंबई-ठाण्यात जाणाऱ्या गोविंदांचा उन्माद आणि उत्सवाच्या निमित्ताने मदिरा प्राशन करून गोंधळ घालणाऱ्या तरुणांमुळे दहीकाल्याला गालबोट लागू लागले. मात्र तरीही उंच दहीहंडी फोडण्याची चुरस सुरूच होती. गोविंदांच्या उन्मादामुळे उत्सवाला बकाल रूप येऊ लागले होते. अखेर दहीहंडीच्या उंचीवर मर्यादा, तर थरामध्ये १४ वर्षांखालील मुलांच्या सहभागावर बंदी घालण्यात आली. पण तरीही मद्यपींच्या उन्मादाला वेसण घालणे जमलेले नाही. आजही उंच दहीहंडीच्या मागणीवर गोविंदा पथके ठाम आहेत.

मुंबईत मार्च २०२० मध्ये करोनाचा पहिला रुग्ण सापडला आणि हळूहळू रुग्णसंख्या वाढत गेली. टाळेबंदी, संचारबंदी लागू झाली आणि सर्व कारभारच ठप्प झाला. उत्सवांवरही करोनाचे संकट घोंघावू लागले. उत्सवांवर निर्बंध घालावे लागले. त्यामुळे उत्सवप्रेमींकडून नाराजीचा सूर उमटला. पण जीवावर बेतण्यापेक्षा अटींचे पालन करून उत्सव साजरा करण्याकडे नागरिकांचा कल होता. आताही करोनाचे संकट उद्याप टळलेले नाही. गर्दी टाळण्याचे आवाहन राज्य सरकार वारंवार नागरिकांना करीत आहे. पण आता नागरिकांचा धीर सुटला आहे. ठिकठिकाणी गर्दी दिसू लागली आहे. याच कारणांमुळे सरकारने दहीकाला आणि गणेशोत्सवावर पुन्हा निर्बंध घातले आहेत. र्निबधांमुळे दहीकाला उत्सव साजरा करता येणार नाही. मात्र तरीही गोविंदा पथके आणि त्यांची पाठराखण करणाऱ्या राजकारण्यांनी बाह्य़ा सरसावून उत्सव साजरा होणारच अशी भूमिका घेतली आहे. करोना संसर्गाचे समूळ उच्चाटन झालेले नाही. त्यामुळे उत्सवप्रेमींनी सदसद्विवेकबुद्धीने वागावयास हवे. समाजभान राखून संकटसमयी मुंबईकरच नव्हे तर महाराष्ट्रातील विविध भागातील नागरिकांच्या मदतीला धावून जाणाऱ्या गोविंदा पथकांनी आपली जबाबदारी ओळखायला हवीच. पुन्हा एकदा मुंबईत रुग्णसंख्या हळूहळू वाढताना दिसत आहे. उत्सवाच्या निमित्ताने होणारी गर्दी त्याला खतपाणी ठरू शकते हे नाकारून चालणार नाही. आणखी एक वर्ष उत्सव साजरा करता आला नाही, तर आभाळ कोसळणार नाही, किंवा संस्कृती, परंपरा लोप पावणार नाही. पण करोनाची बाधा होऊन प्रकृती गंभीर झाल्यास प्राण गमावण्याची वेळ मात्र येऊ शकते. दहीहंडय़ा फोडण्याचा आग्रह धरून गर्दी करायची की करोना संकटाचा सामना करण्यासाठी समाजभान राखायचे हे आता गोविंदांनीच ठरवायचे आहे. करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सध्या कोटय़वधी रुपये खर्च होत आहेत.  तुम्ही-आम्ही कररूपात सरकार आणि पालिकेच्या तिजोरीत कररूपात जमा केलेल्या निधीतून हा खर्च भागविला जात आहे. सध्या कर भरण्याची अनेकांची ऐपत नाही. अनेक उद्योग-व्यवसायांवर निर्बंध आले आहेत. त्यामुळे सरकार, पालिकेला कररूपात पूर्वीइतका निधीही मिळू शकलेला नाही. त्यामुळे आता करोनाबरोबरच आर्थिक संकटाचा

सामना करण्याची वेळ सर्वावरच आली आहे. परिणामी, काळाची पावले ओळखून उत्सवप्रेमींनी आपल्या उत्साहाला तूर्तास आवर घालणे गरजेचे आहे.