मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या शैक्षणिक वर्ष २०२३-२४ (आयडॉल) पदवी व पदव्युत्तर प्रथम वर्ष अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेची मुदत ३० जूनपर्यंत होती. या मुदतीत आयडॉलकडून वाढ करण्यात आली असून विद्यार्थ्यांना १५ जुलै २०२३ पर्यंत प्रवेश अर्ज भरता येणार आहे.
आतापर्यंत विविध पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी सात हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. ही प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन असून विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या https://mu.ac.in/distance-open- learning/ या संकेतस्थळावर प्रवेश अर्ज भरावे व अधिक माहिती घ्यावी, असे आवाहन आयडॉल विभागाने केले आहे. आयडॉलला गतवर्षी २१ अभ्यासक्रमांमध्ये ५८ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. तर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) आदेशानुसार आता आयडॉलमध्ये सीबीसीएस सत्र पद्धतही सुरू करण्यात आली आहे.
हेही वाचा – “समृद्धी महामार्ग शापित आहे, कारण…”, बस अपघातातील २५ मृत्यूंवर संजय राऊतांची प्रतिक्रिया
आयडॉलमध्ये पदवीस्तरावर प्रथम वर्ष बी.ए, बी.कॉम, बी.कॉम अकाउंट्स ॲण्ड फायनान्स, बी.एस्सी आयटी, बी.एस्सी कॉम्प्युटर सायन्स आणि पदव्युत्तर स्तरावर प्रथम वर्ष एम.ए (इतिहास, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, भूगोल, मराठी, हिंदी, इंग्रजी), एम.ए – शिक्षणशास्त्र, मानसशास्र, संज्ञापन व पत्रकारिता आणि जनसंपर्क, एम.कॉम, एम.एस्सी गणित, आयटी, कॉम्प्युटर सायन्स, तृतीय वर्ष बीए.साठी मानसशास्त्राचे सहा विषय आणि पदव्युत्तर पदविका हे अभ्यासक्रम शिकविले जातात. एम.ए मानसशास्त्र या अभ्यासक्रमासाठी पात्रता ही बी.ए मानसशास्त्र असेल, तर एम.ए संज्ञापन व पत्रकारिता आणि जनसंपर्क या अभ्यासक्रमासाठी कोणत्याही शाखेतून पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल.
आयडॉलच्या चर्चगेट, ठाणे, कल्याण, रत्नागिरी व सावंतवाडी येथील विभागीय केंद्रावर प्रवेशप्रक्रियेसंबंधी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच विविध अभ्यासक्रमासाठीच्या अध्ययन साहित्याचेही वितरण केले जाणार आहे. लवकरच पालघर येथेही विभागीय केंद्र सुरू करण्यात येणार आहे, असे आयडॉल विभागाने स्पष्ट केले.
हेही वाचा – भाजपाचा मोठा निर्णय, मुंबईतील ‘आक्रोश आंदोलन’ स्थगित, कारण सांगत आशिष शेलार म्हणाले…
शैक्षणिक २०२३-२४ मध्ये आतापर्यंत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या
अभ्यासक्रम – विद्यार्थी संख्या
प्रथम वर्ष बीए – १६३६
प्रथम वर्ष बी. कॉम – २३२५
प्रथम वर्ष बी. कॉम अकाउंट्स ॲण्ड फायनान्स – २०४
प्रथम वर्ष बी.एस्सी आयटी व कॉम्प्युटर सायन्स – २१२
प्रथम वर्ष एम.ए – १०८२
प्रथम वर्ष एम.कॉम – १४६८
प्रथम वर्ष एम.एस्सी – १५९