लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई: मंगळवारी दि २३ मे रोजी पालिका मुख्यालयात बाहेरील व्यक्तींना प्रवेश बंदी केली जाणार आहे. जी २० परिषदेच्या आपत्ती सौम्यीकरण कार्यगटाचे शिष्टमंडळ बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयास मंगळवारी भेट देणार आहेत. त्यामुळे सर्व सदस्यांच्या सुरक्षा व्यवस्था कारणास्तव सकाळी ११ वाजल्यानंतर अभ्यागतांना महानगरपालिका मुख्यालयात प्रवेश दिला जाणार नाही.

जी २० परिषदेच्या आपत्ती सौम्यीकरण कार्यगटाची दुसरी बैठक मुंबईत दिनांक २३ ते २५ मे २०२३ या कालावधीत होत आहे. या कार्यगटाचे शिष्टमंडळ बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयाला दिनांक २३ मे रोजी भेट देणार आहेत. महानगरपालिका मुख्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा अभ्यास दौरा करुन हे शिष्टमंडळ महानगरपालिकेच्या आपत्कालिन व्यवस्थापन कामकाजाची माहिती जाणून घेणार आहेत. तसेच मुख्यालयाचे पुरातन वास्तूवारसा दर्शन (हेरिटेज वॉक) देखील करणार आहेत. जी-20 शिष्टमंडळामध्ये अतिमहत्त्वाच्या व्यक्ती समाविष्ट असल्याने, या सर्व सदस्यांच्या सुरक्षा व्यवस्था कारणास्तव मंगळवार दिनांक २३ मे २०२३ रोजी सकाळी ११ वाजेनंतर अभ्यागतांना महानगरपालिका मुख्यालयात प्रवेश न देण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. यादिवशी कार्यालयीन वेळ सकाळी ९.४५ ते ११ या वेळेत अभ्यागत येवू शकतात. त्यानंतर मुख्यालयात प्रवेश देता येणार नाही.

आणखी वाचा-वातानुकूलित लोकल, मोनो, मेट्रोमध्ये हवाय सामान डबा

जी-२० देशांच्या गटांचे अध्यक्षपद यंदा भारताकडे आहे. त्याचअंतर्गत देशातील विविध शहरांमध्ये निरनिराळ्या विषयांवर जी-२० देशांच्या कार्यगटांच्या बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून जी-२० देशांच्या ‘आपत्कालीन जोखीम सौम्यीकरण’ या विषयावरील कार्यगटाची बैठक मुंबईमध्ये मंगळवार दिनांक २३ ते गुरुवार दिनांक २५ मे २०२३ या कालावधीत होणार आहे. या बैठकीमध्ये जी-२० परिषदेचे सदस्य असलेल्या २० देशांतील सुमारे १२० पेक्षा अधिक प्रतिनिधी सहभागी होतील. या बैठकीसाठी येणारे विविध देशांचे सदस्य बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयाला २३ मे रोजी सायंकाळी भेट देणार आहेत. मुख्यालय भेटीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणेकडून अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे.

आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला भेट देताना या विभाग अंतर्गत सुरू असलेले विविध उपक्रम, उपाययोजना, यंत्रसामुग्री, नियंत्रण कक्षाचे कामकाज आदी बाबींचा सदस्य अभ्यास करतील.

त्यानंतर, बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या इमारतीचा हेरिटेज वॉक करून मुख्यालय इमारतीचा वैभवशाली इतिहास हे शिष्टमंडळ जाणून घेईल. सुमारे दोन तासांच्या या भेटीदरम्यान शिष्टमंडळासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने स्वागत समारंभाचेही आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक महेश नार्वेकर यांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Entry to the municipal headquarters will be closed tomorrow mumbai print news mrj
Show comments