निसर्गदृश्यं किंवा लॅण्डस्केप हा चित्र-प्रकार ब्रिटिशांच्या आधीपासून भारतात रुजलेला असला, तरी आज जलरंगानं किंवा तैलरंगांनी निसर्गदृश्यं रंगवण्याच्या पद्धती मूलत: पाश्चात्त्यच आहेत. तसं आपल्याला कधीच जाणवत नाही; कारण आपल्या अवतीभवतीच्या, आपल्या देशातल्या.. ‘आपल्या’ निसर्गाचीच चित्रं आपल्याला मुंबईच्या कलादालनांत अनेकदा दिसत असतात! मुंबईच्या अनेक कलादालनांत चालू आठवडय़ात आणि त्यापुढल्या आठवडय़ात योगायोगानं निसर्गचित्रं अधिक दिसणार आहेत. ५ जून हा जागतिक ‘पर्यावरण दिन’. त्यामुळे या निसर्गचित्रांच्या निमित्तानं कुणाला पर्यावरणाची आठवण झाली, तर भलंच.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कर्जत (जिल्हा- रायगड) जवळच्या पिंगळस गावात राहणारे सचिन सावंत यांनी ‘बनारस’ची चित्रं ‘जहांगीर’मध्ये मांडली आहेत. सुमारे दहा वर्षांपूर्वी सावंत यांची सुरुवात याच ‘जहांगीर’च्या बाहेर, ‘आर्ट प्लाझा गॅलरी’त झाली होती. तिथून दिल्लीला किंवा ‘टाटा समूहा’च्या कलावंत-शिबिरातील मानकरी म्हणून जमशेदपूरला समूहप्रदर्शनांत भाग घेण्याची संधी त्यांना मिळाली. अतिशय उजळ आणि आल्हाददायी रंग, पांढरेशुभ्र फटकारे मारून उन्हाचा आणि स्वच्छ प्रकाशाचा भास निर्माण करणं आणि एकंदर चित्रण  हे ब्रश-रंग यांच्या तंत्रानंच झालेलं असूनसुद्धा यथातथ्य दृश्याचा प्रत्यय मिळणं, ही त्यांच्या चित्रांची वैशिष्टय़ं सांगता येतील. वातानुकूल दालन क्रमांक तीनमध्ये हे प्रदर्शन भरलं आहे. आधीच्या दोन दालनांपैकी दुसऱ्या दालनात मानवाकृतींचं (आणि त्यासोबतच्या वस्तूंचंही) हुबेहूब चित्रण करण्यात हातखंडा असलेले पुण्याचे चित्रकार आदित्य फडके यांची चित्रं आहेत. गौतम मुखर्जी, सईदा अली, सुब्रत कर्मकार आणि सुब्रत पॉल या चित्रकारांचं, बंगालच्या चित्रशैलींचा प्रभाव दाखवणारं प्रदर्शन ‘जहांगीर’च्याच सभागृह दालनात भरलं आहे.

‘जहांगीर’च्या पहिल्या वातानुकूल दालनातली चित्रं ‘अमूर्त’ आहेत.. त्यांतले आकार अजिबात निसर्गासारखे नाहीत.. त्यांतून नुसते रंगच नजरेत भरतील.. पण म्हणून ती ‘निसर्गचित्रं’ नाहीत, असं म्हणता येणार नाही.. संतोष राठोड हे या चित्रांचे कर्ते. त्यांचा विश्वास असा की, (चित्रांतले) रंग हे निसर्गाचं ‘प्रतिनिधित्व’ करून थांबत नाहीत.. ते निसर्गाचा भागच असतात! चौकौनी आकारांतून कसा काय निसर्ग दिसणार, असा प्रश्न पडलेल्यांनी गुगलवर वा प्रत्यक्षात ‘पीट माँद्रिआन’च्या चित्रांच्या प्रतिमा जरूर पाहाव्यात. भारतीय अमूर्तविचार या माँद्रिआन आदींच्याही पुढे गेला आणि ‘असण्या’चं चिंतन चित्रांमधून करू लागला, त्या परंपरेतली संतोष राठोड यांची चित्रं आहेत.

मंगल गोगटे या व्यवसायानं प्राध्यापिका. अनेक देशांत, अनेक विद्यापीठांत शिकवण्याचा आणि पदंही भूषवण्याचा अनुभव या व्यवसायानं दिला. चित्रकला हा त्यांचा छंद आहे, याची साक्ष वरळीत (प्लॅनेटोरियमलगत) नेहरू सेंटरच्या मुख्य कलादालनातली त्यांची चित्रं पाहून मिळेल. या प्रदर्शनात भौमितिक किंवा मुक्त रेषांनी तयार झालेल्या आकारांची काही रंगीत कामं असली, तरी प्रदर्शनातून लक्षात राहतील ती निसर्गचित्रंच. गुलमोहोर, शंकासुर, पारिजातक अशा साध्याच फुलांची रूपं गोगटे यांनी टिपली आहेत. चित्रं हळुवारपणे, जपून केली असल्यानं फुलांच्या विषयाला ती हाताळणी कधी कधी शोभूनही दिसू शकते. ‘नेहरू सेंटर’च्याच वर्तुळाकार दालनात सागर साळवे, मयूर श्रीवर्धनकर आणि पद्मा चारी यांची चित्रं पाहायला मिळतील.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Environment day environmental issue environmental art jehangir art gallery