मुंबई: सागरी किनारा मार्गाजवळच्या परिसरात जाहिरात फलक लावण्याच्या मुंबई महानगरपालिकेच्या प्रस्तावाला पर्यावरण विभागाची मंजूरी मिळाली आहे. महाराष्ट्र सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने (एमसीझेडएमए) या जाहिरात फलकांसाठी मंजुरी दिली आहे. गेल्या वर्षी सागरी किनारा मार्ग परिसरात जाहिरात फलक लावण्यास शिवसेनेने (ठाकरे गट) विरोध केला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महापालिकेच्या महसूलात वाढ व्हावी यासाठी पालिकेच्या अनुज्ञापन विभागाने मार्च २०२४ मध्ये भुलाबाई देसाई मार्ग परिसरात जाहिरात फलक लावण्यासाठी निविदा मागवल्या होत्या. त्या फलकांसाठी एमसीझेडएमएच्या परवानगीसाठी पालिका प्रशासनाने प्रस्ताव सादर केला होता. एमसीझेडएमएने या जाहिरात फलकांसाठी ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे.

हेही वाचा >>>मुंबईतील तीन विकासकांना तीन महिन्यांचा कारावास, महारेराच्या आदेशाचे पालन न केल्याने महारेरा अपलीय न्यायाधीकरणाचा निर्णय

एमसीझेडएमएने टाटा गार्डन, ॲमेझॉन गार्डन आणि लाला लजपतराय गार्डन जवळच जाहिरात फलक लावण्याची परवानगी दिली आहे. हे फलक उद्यानात लावण्याची परवानगी नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. फलक लावताना त्याच्या संरचनात्मक स्थिरतेचे काटेकोरपणे पालन मुंबई महापालिकेकडून होणे आवश्यक असल्याचे एमसीझेडएमएने स्पष्ट केले आहे. या जाहिरात फलकांमधून मोठ्या प्रमाणात महसूल मिळण्याचा अंदाज महापालिकेने वर्तविला आहे. तीन ठिकाणी जाहिरात फलकांमधून महापालिकेला महिन्याला एक कोटी रूपयांपेक्षा अधिक महसूल जमा होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

हेही वाचा >>>रेल्वे प्रवासात तरुणीचे कापले केस, रेल्वे पोलिसांनी आरोपीला केली अटक

गेल्या वर्षी सागरी किनारा मार्गालगत जाहिरात फलक बसवण्याच्या महापालिकेच्या निर्णयामुळे शिवसेना (ठाकरे) पक्षाने विरोध केला होता. महापालिकेने तीन ठिकाणी फलक लावण्याचा निर्णय घेताना त्यासाठी निविदा काढली होती. मात्र जाहिरात फलकासाठी निवडण्यात आलेल्या जागा सीआरझेड अंतर्गंत असल्यामुळे शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी विरोध केला होता. सागरी किनारा मार्गावर फलक लावण्याची परवानगी मिळाल्यास ते जिवित आणि मालमत्तेसाठी धोकादायक ठरू शकते. तसेच फलकांच्या दरांत तफावत असल्याने या निविदेत आर्थिक अनियमितता असून ही कंत्राटे तात्काळ रद्द करून चौकशीची मागणी ठाकरे यांनी केली होती. त्यानंतर हा मुद्दा थंडावला होता. त्यातच मंजुरीसाठी प्रस्ताव एमसीझेडएमएकडे पाठवला होता.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Environment department approves billboards near coastal road amy