गणेशोत्सवाच्या निमित्ताने पर्यावरणाचा होणारा ऱ्हास आणि प्लास्टरच्या मूर्तीची विसर्जनानंतर होणारी विटंबना थांबावी यासाठी एका तरुणाने ध्यास घेतला आहे. आपल्या घरी गणेशोत्सव साजरा करताना केवळ गणेशमूर्तीच नव्हे तर संपूर्ण देखावा कागदाच्या लगद्यापासून साकारला असून या देखाव्यातून त्याने भाविकांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे.
मुंबईमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आणि घरोघरी गुरुवारी गणेशाची मोठय़ा धूमधडाक्यात प्राणप्रतिष्ठा झाली. मात्र गणेशोत्सवाच्या निमित्ताने होणारे प्रदूषण आणि पर्यावरणाचा ऱ्हास या बाबी सरकारी यंत्रणांसाठी डोकेदुखी बनू लागल्या आहेत. ध्वनिक्षेपकाचा आवाज आणि वेळेची मर्यादा घालण्यात आली असली तरी त्याचे सर्रास उल्लंघन होत आहे. कर्णकर्कश ध्वनिक्षेपक, डीजेमुळे ध्वनिप्रदूषणात, तर प्लास्टर ऑफ पॅरिस, गुलाल, सजावटीसाठी वापरले जाणारे साहित्य आदी पर्यावरणाच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरत आहे.
गणेश विसर्जनाची मिरवणूक म्हणजे सुजाण नागरिकांसाठी घातवारच ठरत आहे. ध्वनिप्रदूषण, वाहतुकीचे बोजवारा, विसर्जनस्थळी रोडरोमिओंकडून महिलांना सहन करावा लागणारा त्रास, चौपाटय़ांवर होणारा कचरा, गणेशमूर्तीसोबत सोडल्यामुळे किनाऱ्यावर साचलेले निर्माल्य असे चित्र गणेश विसर्जनाच्या दिवशी सर्वच ठिकाणी पाहायला मिळते. विसर्जनाच्या दिवशी मोठय़ा मूर्तीही होणारी विटंबना अनेकांच्या डोळ्यात पाणी आणते.
हे प्रकार कुठेतरी थांबायला हवेत म्हणून विजय मारुती गायकवाड या भायखळा (प.) येथील न्यू म्युनिसिपल बिल्डिंगमध्ये (बिल्डिंग नं. २/१६) वास्तव्यास असलेल्या तरुणाने पाच वर्षांपूर्वी आपल्या घरातूनच पर्यावरण संवर्धनाला सुरुवात केली. पूर्वी घरी शाडूच्या मातीची गणेशमूर्ती पूजण्यात येत होती. मात्र विजयने स्वत: कागदाच्या लगद्यापासून साकारलेली गणेशमूर्ती घरी पूजण्याचा आग्रह धरला. त्याच्या उद्देश कुटुंबाला भावल्यामुळे त्यांनीही त्याला पाठिंबा दिला.
पाण्यात झटकन विरघळणारी आणि वजनाला हलकी गणेशमूर्ती साकारून तो थांबला नाही. तर त्याने कागदाच्या लगद्यापासून आरासही करण्यास सुरुवात केली आहे. पाच वर्षे सातत्याने त्याने वेगवेगळी आरास करीत आसपासच्या रहिवाशांना पर्यावरण संवर्धनाचा धडा देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सर्व समाजाला जोडण्यासाठी गणेशोत्सव सुरू केला. ‘मी येतो तुम्हाला जोडायला आणि तुम्ही येता मला तोडायला’ ही विटंबना थांबवा, असा मोलाचा सल्ला विजयने आपल्या देखाव्यातून दिला आहे. पर्यावरण संवर्धनातील त्याचे हे योगदान खारीचा वाटा असले तरी समाजासाठी एक आदर्श आहे. भाविकांनीही या गोष्टींचा विचार करण्याची वेळ आली आहे.
गिरगाव चौपाटीवरचा देखावा
गणेश विसर्जनाच्या मिरवणुकामध्ये ध्वनी प्रदूषण करणाऱ्या डीजेच्या तालावर होणार अचकटविचकट नृत्य, प्रत्यक्ष विसर्जनाच्या वेळी बाप्पाची होणारी विटंबना, थिल्लर भाविकांचा गोंगाट यामुळे विषंण्ण झालेल्या विजयने यंदा भाविकांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी आपल्या घरी गिरगाव चौपाटीवरचा देखावा साकारला आहे. पुठ्ठा आणि कागदाच्या लगद्याचा त्यात वापर करण्यात आला आहे. चौपाटीच्या आसपासच्या इमारती आणि समुद्रकिनारा देखाव्यात साकारला आहेत. विसर्जनासाठी येणाऱ्या उंच गणेशमूर्ती, पालिकेने ठेवलेले निर्माल्य कलश, विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी किनाऱ्यावरचा कचरा उचलणारे स्वयंसेवक आणि पालिकेचे कर्मचारी, प्लास्टरच्या मूर्तीचे अवशेष असे बरेच काही पर्यावरणाला धोकादायक बनणारे दृश्य विजयने आपल्या घरी साकारले आहे. या देखाव्यातून बोध घेऊन प्रत्येक भाविकाने आपल्या आचरणात बदल करावा असा विजयचा उद्देश आहे. त्यासाठी विजयने एक ध्वनीफितही तयार केली आहे. घरामध्ये छोटय़ा जागेत चलत्चित्र साकारणे शक्य नसल्याने ध्वनीफितीच्या माध्यमातून त्याने भाविकांना पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.