लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : पर्यावरण संवर्धनाला कर्तव्य आणि हक्क या गोष्टींची जोड देण्याची गरज आहे. निसर्गाने मानवाला सर्व काही दिलेले असतानाही, मानवाने अतिहव्यासापोटी सभोवतालच्या पर्यावरणाचे नुकसान केले. यासाठी आपण सर्वांनी जागरुक होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
राज्यात जागतिक वसुंधरा दिनापासून (२२ एप्रिल) महाराष्ट्र दिनापर्यंत (१ मे) ‘पर्यावरण वाचवा वसुंधरा सजवा’ या पर्यावरण संवर्धन व जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या राज्यस्तरीय पर्यावरण संवर्धन जनजागृती अभियानाला मंगळवारी मुंबईतील पवई तलाव येथे स्वच्छता मोहिमेने सुरुवात करण्यात आली. यावेळी पंकजा मुंडे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, मुंबई महानगरपालिका आणि पर्यावरणासाठी काम करणाऱ्या विविध संस्था यांच्या सहयोगाने जागतिक वसुंधरा दिनानिमित्त पवई तलाव येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. निसर्गाप्रती असलेले कर्तव्य योग्यरित्या बजावणे आपले काम आहे. याचबरोबर पर्यावरण संवर्धनाचा ध्यास असणे गरजेचे आहे, असे मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले. तसेच जलयुक्त शिवार योजनेतून अनेक ग्रामीण विभागात पाणी टंचाईवर मात करण्यात यश मिळाले, हा पूर्वानुभव लक्षात घेऊन पर्यावरण विभाग पर्यावरणाच्या रक्षणासाठी लोकाभिमुख चळवळ निर्माण करेल व पवई तलाव स्वच्छता मोहीम ही या चळवळीची सुरुवात असून नागरिकांचा वाढता सहभाग हे खूप मोठे योगदान ठरेल, असा विश्वास पंकचा मुंडे यांनी व्यक्त केला.
दरम्यान, ‘पर्यावरण वाचवा वसुंधरा सजवा’ या अभिनयाच्या निमित्ताने संपूर्ण राज्यात ग्रामपंचायतीपासून ते नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिका क्षेत्रात हे पर्यावरण संवर्धन अभियान राबविण्यात येणार आहे. त्याची सुरुवात मंगळवारी करण्यात आली. यावेळी पर्यावरणासाठी काम करणाऱ्या ‘वनशक्ती’, ‘निसर्ग’, ‘प्रोजेक्ट राईस’, ‘पर्यावरण दक्षता मंच’, ‘नास’, ‘हेल्पिंग हॅंड्स’ आणि ‘बुरानी ट्रस्ट’ या संस्थांचे सदस्य उपस्थित होते. तसेच आमदार दिलीप लांडे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. अविनाश ढाकणेही यावेळी उपस्थित होते.
युवकांशी संवाद
स्वच्छता मोहिमेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी उपस्थित युवकांशी संवाद साधला. यावेळी पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीत तरुणांचा सहभाग वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.